पिंपरी – आम्ही, भारताचे नागरिक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून, याद्वारे प्रतिज्ञा करतो की, आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त नि:पक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणूकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू, अशी प्रतिज्ञा महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घेतली.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीत राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला. यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, उप आयुक्त निलेश भदाणे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, कार्यकारी अभियंता प्रेरणा सिनकर, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, कर्मचारी महासंघाच्या प्रतिनिधी चारूशिला जोशी, तसेच विविध विभागांचे कर्मचारी उपस्थित होते. शपथेचे वाचन जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.
नागरिकांनी मताचा योग्य वापर केला तर ते जनतेमधून योग्य प्रतिनिधी निवडून आणू शकतात. त्या माध्यमातून लोकशाही बळकट होऊ शकते. शहरातील प्रत्येक मतदाराने निवडणुकांमध्ये निर्भयपणे मतदान करून मतदानाचा हक्क बजवावा. इतर मतदारांमध्येही याबाबत जगजागृती करावी.
– प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त