राजगुरूनगर – “माझे कुटुंब माझी जबाबदारी’ सर्वेक्षण अहवाल मोबाइल ऍप्लिकेशनवर अपलोड करण्यास खेड तालुक्यातील शिक्षकांनी विरोध केला आहे. याबाबतचे निवेदन जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकाऱ्याना देण्यात आले आहे.
यावेळी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष शांताराम चेहेरे, तालुका अध्यक्ष नारायण करपे, संदीप जाधव, र. सू. मावळे, सुरेश आदक, आत्माराम शिंदे, चंद्रकांत डफळ, देविदास चेहेरे, सुवर्णा गायकवाड, प्रगती बनकर, नूतन कडलक, रसिक मेंगडे आदी शिक्षक यावेळी उपस्थित होते.
खेड तालुक्यात करोनाबाधितांची संख्या सात हजारांच्या घरात गेली आहे. त्यामुळे ही साखळी तोडण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षकांच्या मदतीने “माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ हे अभियान राबविण्यात आले होते. सर्वेक्षण करताना नगर परिषद व संबंधित ग्रामपंचायतींनी आवश्यक असलेले साहित्य उपलब्ध करून दिले नव्हते तरीही शिक्षकांनी राष्ट्रीय आपत्तीत हे काम प्रामाणिकपणे केले आहे.
मात्र, सर्वेक्षणातून संकलित झालेली माहिती मोबाइल ऍपमध्ये अपलोड करण्यासाठी शिक्षकांना आदेश देण्यात आले; मात्र हे काम जिकिरीचे आणि तांत्रिक अडचणीयुक्त असल्याने शिक्षकांनी त्यास नकार दिला आहे.
अँड्रॉईड मोबाईल नसणे, मोबाइलवर टायपिंग न येणे, इंटरनेटची रेंज नसणे अशा अनेक अडचणी शिक्षकांना आहेत. त्यामुळे याला विरोध असून तज्ज्ञ संगणक ऑपरेटरच्या माध्यमातून सर्वेक्षणाची माहिती संबंधितांनी मोबाइल ऍपवर अपलोड करावी हे काम शिक्षकांना देऊ नये, अशी मागणी राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख सभा खेड तालुका यांच्यावतीने करण्यात आली आहे.