अकलूजच्या शिवरत्न बंगल्यावर नेतेमंडळीच्या गाठीभेटी वाढल्या
अकलूज – भाजपने खासदार रणजितसिंह निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर मोहिते-पाटील नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले असतानाच रविवारी शिवरत्नवर सर्वपक्षीय नेत्यांचे एकत्र येणे आणि बंद दाराआड झालेली बैठक येत्या काळात मोठा राजकीय भूकंप होण्याचे संकेत देत होती; मात्र नेत्यांनी या भेटीगाठीत कुठलीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे सांगत, ही केवळ सदिच्छा भेट असल्याचे सांगितले. भविष्यात राजकारणात मोठा बदल होण्याचे संकेत मात्र देऊन गेले. या दरम्यान भाजपाचे संकटमोचक म्हणून ओळख असणारे गिरीष महाजन यांनीही मोहिते-पाटील यांची भेट घेतली आहे.
भारतीय जनता पार्टीने मोहिते-पाटलांचा विरोध झुगारून विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर केली. यामुळे मोहिते पाटील समर्थकांनमध्ये नाराजी पसरली होती. अशातच मोहिते पाटील नेमका काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागलेले असतानाच रविवारी शिवरत्नवर फलटणपासून करमाळा सांगोल्या पर्यंतचे सर्वपक्षीय नेते दाखल झाले. सर्वांची बंद दाराआड गुप्त खलबते झाली आणि भोजनाचा आस्वादही घेतला; पण माध्यमांसमोर कोणताही राजकीय निर्णय उघडपणे जाहीर न करता कार्यकर्त्यांना सध्यातरी फक्त थांबा आणि पहा वरच समाधान मानावे लागले आहे.
यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासह सर्व मोहिते पाटील कुटुंबातील सदस्य, विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, शेकापचे आमदार जयंत पाटील, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे निंबाळकर, रघुनाथराजे निंबाळकर, फलटणचे आमदार दीपक चव्हाण, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्हा. चेअरमन अनिल देसाई, करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील, माजी आमदार जयवंत जगताप, सांगोला तालुक्यातील डॉ. बाबासाहेब देशमुख, डॉ. अनिकेत देशमुख, संजय कोकाटे, अॅड. दीपक पवार व माण-खटाव भागातील हजारो समर्पक उपस्थित होते.
गिरीश महाजन यांनी आवर्जून घेतली भेट
भाजपाकडून उमेदवारी न मिळाल्याने नाराज असलेल्या मोहिते-पाटलांनी पुन्हा आपला गट सक्रीय करुन मोट बांधण्यास सुरवात केली. यातूनच रविवारी अकलूज येथील शिवरत्न बंगल्यावर मंत्री गिरीष महाजन यांनी भेट दिली. खासदार नाईक-निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासून मोहिते-पाटील समर्थकांमध्ये भाजपा विरोधी चर्चेला उधाण आले होते. रविवारी शिवरत्नवर झालेल्या गुप्त बैठकीनंतर मोहिते- पाटील यांच्या नाराजीला वेगळ्या मार्गाने दिशा मिळाल्याचे सध्यातरी जाणवत आहे. बैठकीनंतर माध्यमांनी विचारल्यानंतर सर्वांनीच नकारार्थी माना हलवत आमचं ठरलयं, असे दाखवत बंद दाराआड झालेल्या चर्चेविषयी रहस्य कायम ठेवले.
गिरीष महाजन यांना कार्यकर्त्यांचा घेराव
शिवरत्नवरील सर्वपक्षीय नेते मार्गस्थ होताच काही वेळातच भाजपचे बडे नेते मंत्री गिरीश महाजन यांचे शिवरत्नवर आगमन झाले. गिरीश महाजन गाडीतून उतरताच कार्यकर्त्यांनी त्यांना घेरून माढ्याचा खासदार कोण, धैर्यशील मोहिते पाटलांशिवाय आहेच कोण, अशा जोरदार घोषणा देत खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांच्या उमेदवारीबद्दलचा रोष व्यक्त केला.
धैर्यशील भैय्यांनी ऐकून घेतल्या भावना
शिवरत्नवर जमलेल्या कार्यकर्त्यांनी धैर्यशील मोहिते- पाटील यांच्या समोर ठाण मांडून तुम्ही माघार घेऊ नका. आम्ही जीवाचं रान करू, पण तुम्हाला खासदारच करू, अशी विनवणी केली. यावर धैर्यशील मोहिते-पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या भावना ऐकून घेतल्या.
राजकीय दृष्ट्या कुठलीही चर्चा झाली नाही. विजयदादांचे आमच्यावर खूप उपकार आहेत त्यांनी बोलवल्यामुळे व त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आलो आहे. आजचा कार्यक्रम हा फक्त स्नेहभोजनापुरता मर्यादित होता. उमेदवारीवरून असणार्या नाराजीबद्दल तुम्हाला माहित आहेच.
-रामराजे नाईक निंबाळकर, माजी सभापती विधान परिषद
महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींला कलाटणी देण्याची कामगिरी अकलूजच्या भूमीतून झाली आहे. राजकारणात पुढच्या दहा ते पंधरा दिवसात मोठा बदल झाल्याचे पाहायला मिळेल. विजयदादांना भेटण्यासाठी मी पवार साहेबाना सांगूनच आलो होतो. मी येणार आहे हे कळाल्यावर दादांनी इतरांनाही भोजनासाठी बोलवल व सर्वजण आले. आज राजकीय काहीच घडामोडी झालेल्या नाहीत.
-आमदार जयंत पाटील, शेकाप