राजगुरूनगर : श्रीराम मंदिर, अयोध्या येथील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने राजगुरूनगर येथे श्री राम लल्लाची भव्य मिरवणूक व शोभा यात्रा काढण्यात आली.
या निमित्ताने शहरातील सर्वच मंदिरांमध्ये होम वहन, पूजापाठ श्रीरामावर आधारित कार्यक्रम घेण्यात आले. दुपारी साडेबाराच्या सुमारास अयोध्यात श्रीराम मंदिरात प्राणप्रतिष्ठापना झाल्यानंतर खेड तालुक्यातील जवळपास सर्वच गावांमध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
तालुक्याची राजधानी असलेल्या राजगुरूनगर शहरातील पुरातन राम मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. येथे सकाळपासून मंदिरात श्रीरामांचे दर्शन घेण्यासाठी रांगा लागल्या होत्या.
राजगुरूनगर शहरातील नागरिकांच्या वतीने दुपारी 2 ते साडेसहा या काळात खेड कृषी उत्पन्न बाजार समिती ते राजगुरुनगर बाजार पेठ-नगर परिषद -अहिल्यादेवी चौक-कोर्ट रस्ता-प्रांत कार्यालय-तिन्हेवाडी रस्ता ते महात्मा गांधी विद्यालय या मार्गाने भव्य मिरवणूक व शोभा यात्रा काढण्यात आली.
यामध्ये मोठ्या संख्येने महिलांसह रामभक्त सहभागी झाले होते. श्रीरामांच्या जयघोषाने तालुक्याची राजधानी राजगुरुनगर दुमदुमली मिरवणुकीनंतर महात्मा गांधी विद्यालयाच्या मैदानावर सर्वाना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.