शिरुर – आगामी काळात शिरूर लोकसभा होणार असून या निवडणुकीत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या विरोधात माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील उतरण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉ. अमोल कोल्हे यांना चॅलेंज दिले आहे. राजकीय बदलांमुळे शिवाजीराव आढळराव पाटील हे लवकरच अजित पवार गटात दाखल होतील आणि अमोल कोल्हे यांच्या विरोधात अजित दादा गटाकडून पुन्हा शिरूर लोकसभेच्या घाटात उभे ठाकतील, अशीच चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
शिवसेना नेते शिवाजी आढळराव पाटलांनी 2004 साली आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या नवनिर्मितीनंतर 2009-2014 असे सलग दोन लोकसभा निवडणूका जिंकल्या होत्या. 2019ला चौकार मारणार अशीच परिस्थिती होती; पण राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी विजय मिळविला.
राज्यातील सत्तासंघर्षांत पक्ष विभागले गेले. अमोल कोल्हे यांनी ’शेतकरी आक्रोश मोर्चा’ काढून, महायुती सरकारच्या मनसुब्यात ’काटे’ टाकले. त्यामुळेच संतापलेल्या अजित पवार यांनी अमोल कोल्हेंची घोडेस्वारी रोखण्याचा चंग बांधला आहे. आगामी लोकसभेच्या घाटात कोल्हे यांनी पुन्हा बारी मारूनच दाखवावी, असे खुलं आव्हान अजित पवार यांनी दिले आहे.
आढळराव पाटील की महेश लांडगे
अजित पवार यांच्याकडे अमोल कोल्हे यांच्या तुलनेत तुल्यबळ उमेदवार तूर्तास तरी नक्कीच नाही; पण दोन पर्याय दिसून येतात. एकतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील आणि सलग तीन वेळा खासदारकीचा अनुभव असणार्या आढळराव पाटील यांना ते स्वतःकडे खेचू शकतात, अथवा पूर्वाश्रमीचे त्यांचे अन् सध्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू आमदार पै. महेश लांडगे यांना स्वगृही परतण्याचे ते आमंत्रण धाडू शकतात.
यापूर्वीचे निकाल व मतदान
लोकसभा निवडणूक 2019
डॉ. अमोल रामसिंग कोल्हे, राष्ट्रवादी काँग्रेस : 6 लाख 35 हजार 830
शिवाजीराव आढळराव पाटील, शिवसेना : 5 लाख 77 हजार 347
लोकसभा निवडणूक 2014
शिवाजीराव आढळराव पाटील, शिवसेना : 6 लाख 42 हजार 828
देवदत्त निकम, राष्ट्रवादी : 3 लाख 41 हजार 375
लोकसभा निवडणूक 2009
शिवाजीराव आढळराव पाटील, शिवसेना : 4 लाख 82 हजार 563
विलास लांडे, राष्ट्रवादी काँग्रेस : 3 लाख 3 हजार 952