पुणे – ‘जगतजननी भवतारिणी मोहिनी तू नव दुर्गा’ ही भैरवी शिष्यांनी सादर करून आणि बंदुकीच्या तीन फैरींची मानवंदना देत शासकीय इतमामात स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांच्या पार्थिवावर सोमवारी वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. डॉ. प्रभा अत्रे यांचे शनिवारी (१३ जानेवारी) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. अमेरिकास्थित त्यांची भाची मनीषा रवी प्रकाश या रविवारी रात्री पुण्यात आल्या. त्यानंतर अत्रे यांच्या पार्थिवावर दुपारी एक वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांचे पार्थिव सकाळी नऊ ते दुपारी १२ वाजेपर्यंत जंगली महाराज रस्त्यावरील स्वरमयी गुरूकुल या त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. याठिकाणी त्यांचे शिष्य, पं. अजय चक्रवर्ती, पं. सुहास व्यास, पं. उल्हास कशाळकर, पं. अजय पोहनकर, विदुषी आरती अंकलीकर – टिकेकर, माजी मंत्री उल्हास पवार, सावनी शेंडे यांसह अनेक मान्यवरांनी अंत्यदर्शन घेतले.
डॉ. अत्रे यांनी स्वत: रचलेली, संगीतबद्ध केलेली जगतजननी भवतारिणी मोहिनी तू नव दुर्गा ही भैरवी अंत्ययात्रा सुरू होण्याआधी त्यांच्या निवासस्थानी शिष्यांनी गायली आणि त्यांना साश्रुनयनांनी निरोप दिला. फुलांनी सजवलेल्या टेम्पोमध्ये आणि डॉ. अत्रे यांच्या बंदिशींच्या स्वरांसोबत जंगली महाराज रस्त्याने ही अंत्ययात्रा टिळक चौकात आणि त्यानंतर शास्त्री रस्त्याने वैकुंठात आली.
पार्थिवावरील तिरंगा डॉ. अत्रे यांच्या भाची मनीषा रवी प्रकाश यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावतीने जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांनी पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. अतिरिक्त पोलीस आयुक्त रमानाथ पोकळे आणि प्रवीणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त संदीपसिंग गिल्ल, रास्तापेठ एज्युकेशन सोसायटीचे संजीव महाजन, स्वरमयी गुरूकुलचे प्रसाद भडसावळे यांनी श्रद्धांजली वाहिली. आर्य संगीत प्रसारक मंडळीचे श्रीनिवास जोशी, व्हायोलिनवादक अतुलकुमार उपाध्ये, गायन, वादन क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटीच्या गुरुवर्य आबासाहेब अत्रे प्रशालेमध्ये मंगळवारी (१६ जानेवारी) सकाळी नऊ ते दुपारी एक या वेळेत अस्थिकलश दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. डॉ. प्रभा अत्रे या शाळेच्या पहिल्या विद्यार्थिनी आणि संस्थेच्या अध्यक्षा होत्या.