विजय रणस्तंभ अभिवादन सोहळा
शिक्रापूर – एक जानेवारी रोजी पेरणे येथील विजय रणस्तंभ अभिवादन अनुषंगाने शिक्रापुर व तळेगाव ढमढेरे येथील आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेश शिरूरचे उपविभागीय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी हरेश सूळ यांनी दिले आहेत.
एक जानेवारी २०२४ रोजी पेरणे येथील विजय रणस्तंभास अभिवादन करण्यासाठी संपूर्ण देशातून लाखोंच्या संख्येने अनुयायी येत असतात. या कालावधीत रविवार दि. ३१ डिसेंबर रोजी शिक्रापूर येथील व सोमवार दि. १ जानेवारी रोजी तळेगाव ढमढेरे येथील आठवडे बाजार आहेत. आठवडे बाजार मोठ्या प्रमाणात भरत असतात.
आठवडे बाजारचे दिवशी मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर गर्दी होत असते. त्याच दरम्यान विजय रणस्तंभास अभिवादन करण्यासाठी बाहेरुन येणाऱ्या अनुयायांची संख्या खुप जास्त प्रमाणात असल्याने अपघात घडुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बसेस पार्किंग हे शिक्रापूर बाजार तळावर असून वक्फ बोर्ड पार्किंगकडे जाणाऱ्या व येणाऱ्या बसेस या शिक्रापूर ते तळेगाव ढमढेरे बाजार तळावरून कासारीफाटा मार्गे पाठविण्याचे प्रस्तावित असलेने मौजे शिक्रापूर व तळेगाव ढमढेरे येथील आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेश स्थानिक प्रशासनास देण्यात आले आहेत.
त्यामुळे रविवार दि. ३१ डिसेंबर रोजी शिक्रापूर येथील व सोमवार दि. १ जानेवारी रोजी तळेगाव ढमढेरे येथील आठवडे बाजार बंद असल्याचे तळेगाव ढमढेरे येथील सरपंच अंकीता भुजबळ व शिक्रापुरचे सरपंच रमेश गडदे यांनी सांगितले आहे.