दौंड – पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग सेवा रस्त्याच्या कामासाठी सुमारे ६८ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या कामाची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, प्रत्यक्ष सेवा रस्त्याचे काम लवकरच सुरू होईल, अशी माहिती दौंडचे आमदार अॅड. राहुल कुल यांनी दिली.
आमदार कुल म्हणाले की, दौंड तालुका हद्दीमध्ये ६५ किलोमीटरहून अधिक लांबीचा रस्ता राष्ट्रीय महामार्ग आहे. त्याचे विस्तारीकरण २०१२-१३ मध्ये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या माध्यमातून केले होते त्यावेळी अनेक गावांमध्ये सर्व्हिस रोड (सेवा रस्ता) ची कामे अपूर्ण राहिल्याने अपघातामध्ये नागरिकांना जीव गमवावा लागला. ही गंभीर बाब लक्षात घेऊन आमदार अॅड. कुल यांनी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचेकडे सातत्याने पाठपुरावा केला.
त्याला यश आले असून, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारे पुणे सोलापूर महामार्गावरील दौंड तालुका हद्दीतील यवत, भांडगाव, वाखारी, चौफुला, वरवंड, पाटस, मळद, खडकी, स्वामी-चिंचोली येथे विविध ठिकाणी ६८ कोटी रुपयांच्या व ३२ किमी लांबीच्या सर्व्हिस रोडच्या (सेवा रस्ता) कामास मंजुरी मिळाली आहे, असे त्यांनी सांगितले. आमदार अॅड. कुल यांनी केंद्रीय वाहतूक मंत्री गडकरी यांचे आभार देखील मानले आहेत.