केंदूर-वाजेवाडी (ता. शिरूर) येथील चौफुला चौकात एका पाणीपुरी विक्रेतेच्या राहत्या खोलीत वापरात असलेल्या रेफ्रिजरेटरचा अचानक स्फोट झाला. यात दोन युवक गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना गुरुवारी (दि. 22) दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली.
अमित मोहन तिखे (वय 25) आणि त्याचा मित्र शंकर उर्फ बंटी सुरेश साबळे (वय 23, दोघेही राहणार वाजेवाडी, ता. शिरूर) अशी स्फोटातील जखमींची नाव आहेत. वाजेवाडी हद्दीत चौफुला चौकात असलेल्या योगेश खंडू शेळके यांच्या इमारतीत भाडेकरू रमेशचंद्र आहेर हा पाणीपुरी विक्रेता वास्तव्यास आहे. त्याच्या खोलीत अचानक मोठा स्फोट झाला.
हा स्फोट इतका भीषण होता की, त्याच्या खोलीलगत रस्त्याच्या बाजूने असलेल्या नव्याने सुरू केलेल्या चप्पल आणि कापड दुकानातून साहित्य बाहेर पडले. या दुकानात असलेले दुकान मालक अमित तिखे व शंकर साबळे हे दोघेही स्फोटाच्या भीषणतेमुळे दुकानाच्या बाहेर फेकले गेले. त्यात अमितला भाजल्याने गंभीर जखमी झाला तर शंकर देखील जखमी झाला आहे.
हा स्फोट इतका भीषण होता की दुकानाच्या दरवाजा आणि काचा चारशे ते पाचशे फूट लांब रस्त्यावर उडून पडल्या. दादा वाजे या युवकाने तात्काळ धावून येत रुग्णवाहिकेची वाट न बघता गंभीर जखमी झालेल्या दोन्ही युवकांना स्वतःच्या कारने शिक्रापूर येथील एका खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले.
ही घटना समजताच शिक्रापूर पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक मयूर वैरागकर, उपनिरीक्षक राजेश माळी, हवालदार प्रशांत गायकवाड यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. दरम्यान परिसरात गॅसच्या टाकीचा स्फोट झाल्याची अफवा पसरली होती; मात्र पोलिसांनी पाहणी केल्यानंतर प्रथमदर्शनी रेफ्रिजरेटरच्या आतील गॅसचा स्फोट झाल्याचे निदर्शनास आले आहे.