शिरुर तालुक्यातील शेतकरी हताश
शिक्रापूर : सध्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जनावरांमधील लम्पी संसर्गजन्य आजाराची लागण होत आहे. पुणे जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये काही प्रमाणात जनावरे बाधित सापडलेली आहेत. शिरुर तालुक्यात देखील लम्पीसदृश जनावरे आढळून आलेली असल्याने शेतकरी हताश झाला आहे. त्यामुळे दुग्ध उत्पादनात घट झाली आहे.
शिरुर तालुक्यात जनावरांची संख्या जास्त असून अनेकदा जनावरांना वेगवेगळ्या आजारांची लागण झाली आहे. सध्या बुधे वस्ती येथे तीन जनावरे लम्पीसदृश आढळल्याने शिक्रापूरसह परिसरात शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
करोनाने पाठ फिरवल्यानंतर आता शेतकऱ्यांच्या जनावरांचा आजार उद्भवला आहे. आजार देशी जनावरांसह संकरित जनावरांना देखील होत असल्याने शेतकरी सुद्धा हवालदिल झाला आहे. मात्र, शेतकऱ्यांनी जनावरांमध्ये काही बदल तसेच आजारांची लक्षणे जाणवल्यास तातडीने पशूवैद्यकीय डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन पशु संवर्धन विभागाच्या वतीने केले आहे.
गोठा व परिसर स्वच्छ ठेवा- डॉ. खंडागळे
पशुधनविकास अधिकारी डॉ. प्रदीप खंडागळे म्हणाले की, सध्या लम्पी आजाराचा प्रादुर्भाव वाढत चाललेला आहे. परिसरात देखील लम्पीसदृश जनावरे आढळून येत असल्याने शेतकऱ्यांनी गोठा व परिसर स्वच्छ ठेवत त्या ठिकाणी माश्या होणार नाहीत, याची काळजी घ्यावी. सध्या बाजारातून जनावरे आणणे टाळावे.
प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना- प्रसाद
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद म्हणाले की, पुणे जिल्हा परिषदेच्या पशु संवर्धन विभाग, पशुसंवर्धन आयुक्तालयांच्या मार्गदर्शनाखाली लम्पीसारख्या चर्मरोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व जनावरांना उपचार मिळण्यासाठी आवश्यक पावले उचलत आहेत. ग्रामपंचायतीने गोठ्यात फवारणी करण्यासाठी खर्च करण्याची परवानगी दिल्याचे त्यांनी सांगितले.