नारायणगाव – महाराष्ट्र शासनाचा उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मेरी माटी-मेरा देश’ उपक्रमांतर्गत गिनीज ‘वल्ड रेकॉर्ड’साठी ‘सेल्फी विथ माती’ फोटो संकलनात सर्वोत्तम योगदान दिल्याबद्दल नारायणगाव (ता. जुन्नर) येथील ग्रामोन्नती मंडळाच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचा गौरव करण्यात आला.
महाविद्यालयाने ‘सेल्फी विथ माती’ अंतर्गत सर्वाधिक फोटो सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठास दिले आहे. त्याची दखल घेवून विद्यापीठ व राज्य शासनाने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटे, कार्याध्यक्ष कृषीरत्न अनिल मेहेर व संचालकांचा सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र देवून विशेष सन्मान केला असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आनंद कुलकर्णी यांनी दिली. सन्मान सोहळा पुणे येथील प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडला.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आनंद कुलकर्णी, राष्ट्रीय सेवा योजना, पुणे ग्रामीणचे जिल्हा समन्वयक, प्रा. डॉ. श्रीकांत फुलसुंदर यांनी नारायणगाव महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागातील कार्यक्रमाधिकारी व स्वयंसेवकांच्या माध्यमातून 18 हजार 500 ‘सेल्फी विथ माती’ फोटो संकलित करून उपक्रमात भरीव कामगिरी केली.
कार्यक्रमास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पराग काळकर, कुलसचिव डॉ. विजय खरे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे सल्लागार सदस्य राजेश पांडे, रासेयो संचालक डॉ. सदानंद भोसले, महापौर मुरलीधर मोहोळ, प्राचार्य डॉ.संजय चाकणे आदी मान्यवर उपस्थित होते. ग्रामोन्नती मंडळाचे कार्यवाह रवींद्र पारगावकर, उपकार्याध्यक्ष डॉ. आनंद कुलकर्णी, सहकार्यवाह अरविंद मेहेर व पदाधिकारी यांनी स्वयंसेवकांचे अभिनंदन केले.