मिलन म्हेत्रे
पुणे- करोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक प्रकारच्या निर्बंधांच्या नियमावलींची यादी सरकारने दिली आहे; पण त्याकडे दुर्लक्ष करत लग्नकार्यामध्ये सर्रास डीजेचा वापर पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिसून येत आहे. त्यामुळेच करोना असो किंवा नसो… आवाज वाढव डीजे… म्हटल्याशिवाय कार्यक्रमांना रंगत येतच नाही, ही आपली मानसिकता दिसून येत आहे.
करोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लग्न समारंभ, मिरवणुका यांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. पर्यायाने डीजेच्या वापरावरही बंदी आहे; पण तरीही डीजेचा वापर होत असल्याचे पुणे जिल्ह्यांतील ग्रामीण भागात होत आहे. मंचर, जुन्नर परिसरातील काही डीजे चालकांसह वादक, ड्रायव्हर, डीजे ऑपरेटर, कार्यालय मालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हीच गोष्ट जुन्नर तालुक्यातही घडली आहे.
करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता प्रशासनातर्फे निर्बंधांबाबत वारंवार सूचना देण्यात येत आहेत; पण त्याला नागरिक जुमानत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. वास्तविक करोना नव्हता त्यावेळीही डीजेच्या मिरवणुकींना, भिंतींना बंदी घालण्यात आली होतीच. रहिवासी क्षेत्रात अनुक्रमे 55 ते 45 डेसिबल दिवसा आणि रात्री अशी आवाजाची क्षमता आहे, तसेच शांतताप्रवण क्षेत्रात अनुक्रमे 50 ते 40 क्षमता आहे.
मात्र, नियम धुडकावून डीजे लावण्याचे प्रकार वाढलेच होते. ध्वनिप्रदूषणाचे उल्लंघन केल्यास 2000 च्या एनव्हायरनमेंट ऍक्ट 1986 च्या कलम 15 प्रमाणे पाच वर्षांची कैद किंवा एक लाख रुपये दंड अशी शिक्षेची तरतूद आहे आणि एकदा नोटीस दिल्यावर पुन्हा जर असे कृत्य झाले तर सात वर्षांची शिक्षा होऊ शकते. या नियमानुसार गुन्हे दखलपात्र आणि अजामीनपात्र असून असे गुन्हे प्रथम न्यायदंडाधिकारी न्यायालयाकडे चालतात.
ग्रामीण भागात तालुक्यांच्या मुख्य भागात डीजेंच्या गाड्यांचा वापर केला जात नाही, असे सांगितले जाते; पण येथील परिसरांतील ग्रामीण भागांत किंवा वाड्या-वस्त्यांवर मोठ्या प्रमाणात याचा वापर केला जात होताच. पोलीस परवानगी घेताना पारंपरिक वाद्यांची परवानगी घेतली जाते आणि डीजेच्या गाड्या आणल्या जातात, ही वस्तुस्थिती आहे. त्यावेळीही यावर कारवाया झाल्या आहेत.
उत्पन्नाचा “बॅकलॉग’ भरून काढण्याचे “लक्ष्य’
गेल्या वर्षी मार्च महिन्यात करोनाचा शिरकाव झाला आणि त्यानंतर लॉकडाऊन लागले, त्यामुळे संपूर्ण लग्नसराईचा हंगाम वाया गेला. आता अनलॉकच्या शिथिलतेमुळे काही गोष्टींना निर्बंधांसह परवानगी दिली आहे; पण त्या निर्बंधांना पायदळी तुडवून उत्पन्नाचा “बॅकलॉग’ भरून काढण्याचे लक्ष्य डीजे व्यावसायिकांचे दिसून येत आहे.
तासाला 20 ते 25 हजारांचे उत्पन्न
डीजेच्या एका गाडीमागे तासानुसार 20 ते 25 हजारांपासून 50 हजारांपर्यंत भाडे मिळते. या गाड्या बनवण्यासाठीचा खर्च 15 लाखांपासून 50 लाखांपर्यंत आहे आणि हा व्यवसाय लग्नसराईत म्हणजे दिवाळीपासून पुढे मे-जून पर्यंत चालतो. सीझनमध्ये याचे भाडेदर वाढतात. डीजेच्या गाडीमध्ये येथील वाद्यांची उपकरणे वाजवण्यासाठी साधारणपणे सात ते आठ लोकांना रोजगार मिळतो.
…कारवाई झाल्यास मालकही अडचणीत
करोनाच्या पार्श्वभूमीवर डीजेंना बंदी आहे, मात्र कार्यालय आणि डीजे मालकांच्या समन्वयातून हा व्यवसाय होत असल्याने आणि त्यात दोघांचेही लागेबांधे असल्याने या गोष्टींना परवानगी दिली जात असल्याचे दिसून येत आहे.
मंचरमध्ये लग्नसमारंभात डीजेचा वापर केल्याने भादवि कलम 188 – 269 राष्ट रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम 51 सह साथीचे रोग पसरविण्यास कारणीभूत ठरल्यावरून डीजेचालक, कार्यालयचालक, डीजे ऑपरेटर, ड्रायव्हर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे, अशा गोष्टी आढळल्यास यापुढेही कारवाई क रण्यात येणार आहे.
– सुधाकर कोरे , पोलीस निरीक्षक, मंचर
जुन्नर भागात दोन ठिकाणी डीजेवर मिळालेल्या माहितीनुसानर कारवाई करण्यात आली आहे. या दोन्ही प्रकरणांमध्ये संबंधितांवर साथीचे रोग पसरविण्यास कारण ठरल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करोनाचे निर्बंध लागू असेपर्यंत अशा घटना घडल्यास त्यावर त्वरीत गुन्हे दाखल केले जाणार आहेत.
– मधुकर पवार, पोलीस निरीक्षक, आळेफाटा, जुन्नर