निवडणुक आयुक्त श्रीकांत देशपांडे यांचे आवाहन
सोरतापवाडी – शेवराई सेवाभावी संस्थेच्या वतीने नामदेव भोसले यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात मतदान विषयी जनजागृती कार्यक्रम होणे गरजेचे असल्याचे मत राज्याचे निवडणूक आयुक्त श्रीकांत देशपांडे यांनी सांगितले.
यावेळी कै. ज्ञानदेव भोसले श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी पुणे जिल्ह्यातील तीन लाख पारधी व भिल्ल समाजाला मतदान जनजागृतीवर प्रत्येक घरी मतदान कार्ड घर पोच उपक्रम राबविण्यात आला. या वेळी निवडणूक आयुक्त श्रीकांत देशपांडे यांच्या हस्ते आदर्श माता शेवराबाई भोसले यांचा सत्कार करण्यात आला.
हवेली तालुक्यातील नायगाव, ऊरुळी कांचन, टिळेकर वाडी, खामगाव टेक, निवडणुक आयुक्त देशपांडे यांच्या हस्ते आदिवासी, फासे पारधी व भिल्ल समाजला मतदान कार्ड, रेशनिंग कार्ड, जातीचे दाखले, सातबारा, उत्पन्नाचा दाखले वाटप करण्यात आले.
यावेळी देशपांडे यांनी पारधीवस्तीस भेट देऊन पारधी समाजाच्या समस्या व उपाय तसेच प्रत्येक मतदानाचे महत्त्व काय आहे, हे पटवून दिले व त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना काही सूचना दिल्या.
तसेच ज्या पारधी बांधवांना कलंकीत नजरेने पाहिले जात होते, अशा कुटुंबासाठी विशेष लक्ष देऊन पारधी समाजातील ज्येष्ठ समाजसेवक नामदेव भोसले यांनी पारधी समाजातील तरुणांना मासेमारी व्यवसायामध्ये आणले व बोटिंग व्यवसाय, शेळी पाळण व शेतीमध्ये रोजंदारी अशा व्यवसायामध्ये आणले.
याप्रसंगी हवेलीचे उपविभागीय दंडाधिकारी संजय आसवले, शिरुरच्या प्रांत देवकाते, बारामतीचे प्रांत वैभव नारवडकर, हवेलीचे तहसीलदार किरण सुरवसे, इंदापूरचे तहसीलदार. श्रीकांत पाटील, तसेच जिल्ह्यातील नायब तहसीलदार, मंडलअधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, आणि ज्येष्ठ लेखक भास्कर भोसले पत्रकार उपस्थित होते.