हडपसर – हडपसर क्षेत्रीय कार्यालयातील कंत्राटी सफाई कामगारांना तीन महिन्यांपासून पगार दिलेला नाही, त्यामुळे संतप्त सफाई कामगारांसह शिवसेना शहर प्रमुख प्रमोदनाना भानगिरे यांनी क्षेत्रीय कार्यालय येथे एकत्र येऊन कामगारांच्या अडचणी समजून घेतल्या. त्यानंतर तत्काळ अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमणार यांच्याशी संपर्क साधून या कर्मचाऱ्यांचा पगार लवकरात लवकर करावा, अन्यथा तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा दिला.
महापालिकेच्या हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत एकूण २२ आरोग्य कोठी आहेत. यामध्ये एकूण ७०३ कंत्राटी सफाई कामगार काम करतात. दररोज सकाळी लवकर येऊन कामगार हडपसर परिसरामधील रस्ते स्वच्छ करतात. मात्र, याच कर्मचाऱ्यांना ठेकेदाराकडून वेळेत पगार मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांना अडचणीला सामोरे जावे लागत आहे.
यामुळे क्षेत्रीय कार्यातील सर्व सफाई कर्मचाऱ्यांनी अनेक दिवस पगाराची वाट पाहून अखेर हडपसर क्षेत्रीय कार्यालयाच्या आवारात एकत्र येऊन शिवसेना पुणे शहर प्रमुख प्रमोदनाना भानगिरे यांच्याकडे आपल्या व्यथा मांडल्या. यावेळी जिल्हाध्यक्ष उल्हास तुपे उपस्थित होते. यावेळी भानगिरे यांनी तत्काळ महापालिका अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार यांच्याशी संपर्क साधून कर्मचाऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी विनंती केली. अन्यथा सफाई कर्मचाऱ्यासाठी आंदोलन करावे लागेल, असा इशारा दिला.
“हडपसर परिसरात ठेकेदार मार्फत सुमारे ६०० कामगार झाडू काम करत आहेत. त्यांचे पगार गेली तीन महिन्यांपासून थकले आहेत. त्यामुळे त्यांच्या तक्रारी जाणून घेतल्य. त्यानंतर लगेचच महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमणार यांच्याशी संपर्क साधून कामगारांना त्वरीत पगार देण्याची मागणी केली आहे.” – प्रमोदनाना भानगिरे, शहर प्रमुख , शिवसेना पुणे शहर