अधिकारी, प्रशासन अकार्यक्षम असल्याचा आरोप
संबंधित अधिकाऱ्यांकडून केराची टोपली
दिवाणी न्यायालयात फौजदारी करण्याचा दिला इशारा
ओतूर – येथील जुना डोमेवाडी रस्ता रहदारीस खुला करून द्यावा, अशा मागणीसाठी तसेच तिथे झालेल्या अतिक्रमण विषयी या ठिकाणच्या जागरूक नागरिकांनी जुन्नरचे गटविकास अधिकारी यांच्याशी पत्रव्यवहार केला होता. यावर ग्रामपंचायत प्रशासन सुस्त असल्याबाबत देखील कळविले होते. यावरून जुन्नरचे गट विकास अधिकारी यांनी ग्रामपंचायत ओतूरला आदेश काढून होणारे अतिक्रमण दूर करून रस्ता ग्रामस्थांना खुला करून देण्याचा आदेश केला; मात्र या आदेशाला संबंधितांनी केराची टोपली दाखवली. याचा निशेघ म्हणून संबंधित ग्रामस्थ सुभाष मनोहर तांबे यांनी उपोषणास बसण्याबाबतचे निवेदन तहसीलदार जुन्नर यांना दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, ओतूर येथील जुना डोमेवाडी रस्ता अर्जदारांच्या कौटुंबिक उदरनिर्वाहाच्या उद्देशापोटी अत्यंत गरजेचा व महत्त्वाचा रस्ता आहे. लक्ष्मण हरिभाऊ डुंबरे यांनी जुना डोमेवाडी रस्त्यावरील सर्व प्रकारची बेकायदेशीर अतिक्रमणे/अडथळे संदर्भ विषयात नमूद केलेप्रमाणे पूर्णत: निकाली होईपर्यंत जुना डोमेवाडी रस्ता पूर्ण अतिक्रमणे तसेच दंडेलशाही पद्धतीने बसलेले व्यावसायिक यांना त्वरित हटविण्याबाबत गटविकास अधिकारी यांच्या आदेशाचे पालन तात्काळ व्हावे, जुना डोमेवाडी रस्त्यावर मच्छीविक्रेते व भाजीपाला विक्रेते यांचे राजरोसपणे ग्रामपंचायतच्या कृपाआशिर्वादाने व्यवसाय सुरू आहेत.
या रस्त्यावरील बेकायदेशीर अतिक्रमणापोटी ग्रामपंचायतकडून वर्षानुवर्षे कर आकारला जात आहे. ही बाब मुंबई ग्रामपंचायत अधिनियमाच्या विरोधात व त्याचा भंग करणारी असल्याचे या निवेदनात म्हटले आहे. तसेच जुन्या डोमेवाडी रस्त्यावरील सर्व प्रकारची बेकायदेशीर अतिक्रमणे ही नमुद केले प्रमाणे पुर्णतः निकाली होईपर्यंत या रस्त्यावर कोणत्याही प्रकारचे अतिक्रमणे व अडथळा होणार नाही याबाबतचे आदेश तात्काळ व्हावेत अशी आग्रही मागणी याद्वारे करण्यात आली आहे.
अन्यथा आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबायला लागेल तसेच योग्य त्या दिवाणी न्यायालयात फौजदारी व दिवाणी दावा दाखल करणे भाग पडेल व त्याच्या परिणामास केवळ संबंधित जवाबदार असतील असा, इशारा देण्यात आला आहे. तर अन्यायग्रस्त स्थानिक ग्रामस्थांसह सोमवारी (दि. 20) ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार असल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.