आश्वासनानंतर आमदार जगतापांचे तिसऱ्या दिवशी उपोषण मागे
सासवड – पुरंदर तालुक्यात बुधवार (दि. 5) पासून “एक गाव, एक दिवस’ ही योजना युद्धपातळीवर राबविली जात आहे. त्यासाठी महावितरणकडून दि. 5 जुलै ते 26 ऑगस्ट असा 53 दिवसांच्या कालावधीचे 115 गावांचे गावनिहाय वेळापत्रकच जाहीर करण्यात आले आहे. या माध्यमांतून महावितरण पुरंदर तालुक्यातील सर्व वीज समस्या सोडविणार आहे. असल्याच्या लेखी आश्वासन दिल्यानंतर आमदार संजय जगताप यांनी तिसऱ्या दिवशी आपले उपोषण मागे घेतले.
महावितरणच्या अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार, अकार्यक्षमता आणि भोंगळ कारभाराबाबत पुरंदर-हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी सुरू केलेले उपोषण आणि जन आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशीही म्हणजेच बुधवारी (दि. 5) जनसामान्यांचा मोठा पाठिंबा मिळताना दिसत आहे. सर्व तक्रारींचे निवारण होईपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याचे आमदार संजय जगताप यांनी स्पष्ट केले होते. दरम्यान, सायंकाळी आश्वसनानंतर उपोषण मागे घेतले.
सासवड येथील उपोषण तिसऱ्या दिवशीही सुरू होते त्यामुळे उपस्थित शेतकरी आणि नागरिकांनी शासनाच्या निष्क्रीयतेचा निषेध केला होता. आमदार संजय जगताप यांसह प्रकाश पवार, तुषार माहूरकर, विठ्ठल मोकाशी, अनिल जाधव, चंद्रकांत बोरकर, नितीन भोंगळे, सागर जगताप उपोषणाला बसले होते. यातील तिघांच्या तब्येत उपोषणामुळे खालावल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत. दरम्यान, बुधवार तिसऱ्या दिवशी पुरंदरसह हवेलीतीलही शेकडोंच्या संख्येने गावोगावचे नागरीक, महिला, शेतकरी सासवड येथील शिवतीर्थावर येऊन आमदार संजय जगताप यांना पाठिंबा देत होते. यामध्ये महिला आणि युवकांची संख्या अधिक होती. गावोगावच्या शेतकरी, सर्वसामान्य नागरीकांचा आमदार संजय जगताप यांना पाठिंबा वाढताना दिसत होता.
…अन्यथा पीएमपीएमएलची सेवा बंद
पुणे महानगरपालिका पीएमपीएमएल कामगार संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आमदार संजय जगताप यांच्या उपोषणाला पाठिंबा देत शासनाने याबाबत 24 तासांत मार्ग काढावा अन्यथा पुण्यातील पीएमपीएमएलची सेवा बंद करून रस्त्यावर उतरू असा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला होता.
लोकशाहीत लोकप्रतिनिधीचा छळ
उपोषण करण्यापूर्वी आठ दिवस आधी आमदार संजय जगताप यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना कार्यक्षमता दाखविण्याचे आवाहन करीत उपोषणाचा इशारा दिला होता. मात्र याकडे दुर्लक्ष केल्यामुळे लोकप्रतिनिधीला उपोषण करण्याची वेळ आली आहे. लोकशाहीत लोकप्रतिनिधीचा छळ करणे ही दुर्दैवाची बाब आहे. आमच्या संयमाचा अंत पाहू नये अन्यथा सासवड आणि जेजुरी बंदची हाक देऊ. तातडीने दखल घेऊन सर्व मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा आंदोलन आणखी केले जाईल, असा इशारा पुरंदर मेडिकल असोसिएशनचे डॉ. दीपक जगताप यांनी दिला होता.
पुरंदरचे महावितरण झाले ऍक्टिव्ह
आमदार संजय जगताप यांच्या उपोषणाच्या दुसऱ्या दिवसांपासून पुरंदरच्या महावितरणचे अधिकारी, कर्मचारी कामाला लागले आहे. अनेक वर्षे प्रलंबित असलेले मीटर, नवीन रोहित्र बसविणे, विजजोड देणे, जूने खांब आणि लोंबकळणाऱ्या तारा बदलणे, पाणीपुरवठा योजनांना विजजोड देणे तसेच शेतकऱ्यांची चुकीची विजबिल कमी करण्यात येत आहेत. नवीन पोल देण्याचीही कामे अनेक ठिकाणी सुरू झाले आहे. 12 वर्षांपासून प्रलंबित असणारे प्रश्न सुटताना दिसत आहेत.