दत्तात्रय गायकवाड
वाघोली – शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघात भाजपच्या वतीने जोरदार शक्ती प्रदर्शनाचे अनेक कार्यक्रम राबवून आपली पकड मजबूत केली जात आहे. हीच मजबूत पकड आता सामान्य नागरिकांचे लक्ष वेधू लागली आहे.
शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघावर सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अशोक पवार हे आपल्या विकासकामांचा आणि नागरिकांशी असलेला संपर्क या जोरावर आगेकूच करत आहेत. तर भाजपकडून विधानसभेचा चेहरा म्हणून सध्या प्रदीप कंद हे इच्छुक असल्याने तशी तयारी व नियोजन त्यांच्याकडून होत असल्याने भाजपच्या कार्यक्रमांची आणि भाजपच्या जनतेचे प्रश्न सोडवण्याची तत्परता आता दिसून येऊ लागली आहे. भाजप आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपले वेगळेपण सिद्ध करण्यासाठी तयार झाला आहे.
हवेली तालुक्यात असणार्या गावांमध्ये वर्चस्व निर्माण करण्यासाठी भाजपकडून युवा मोर्चा, महिला संघटन, महिला मोर्चा, उद्योग, व्यापार, कामगार, तसेच पक्षाच्या तालुकास्तर जिल्हास्तर अनेक आघाड्यांवर आजी-माजी सरपंच उपसरपंच तसेच विद्यमान ग्रामपंचायत पदाधिकारी आज माझी जिल्हा परिषद सदस्य यांची वर्णी लागत असल्याने पक्षाची संघटनात्मक बाजू मजबूत होऊ लागली आहे.
लोकसंख्येने जास्त असणार्या लोणी काळभोर, उरुळी कांचन, वाघोली यांसारख्या गावांवर विशेष लक्ष दिले जात असून जास्तीत जास्त लोकाभिमुख कार्यकर्ते पक्षाच्या संघटनात्मक जबाबदारीचे शिलेदार बनू लागले आहेत. सहकार क्षेत्रामध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपने आपले वेगळेपण यापूर्वी सिद्ध केले आहे; मात्र प्रदीप कंद हे आमदार अशोक पवार यांना काट्याची टक्कर देण्यासाठी विकास कामांबरोबर पक्षाचे कार्यकर्ते व अनेक दिग्गजांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश करण्यासाठी प्रयत्न करत आहे.
वाघोली येथे जवळपास चार ते पाच वेळा तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विविध कार्यक्रमांना हजेरी लावत पक्षातील पदाधिकार्यांना ताकद दिली आहे. पुणे शहरापासून जवळ असणार्या पूर्व हवेलीतील अनेक गावांमध्ये आजदेखील विविध ठिकाणी बदलांच्या मोहिमा राबवल्या जात असल्याने तसेच सामान्यांपर्यंत विकास कामांची यादी पोहोचत असल्याने भाजपवरचा विश्वास नागरिकांचे वाढू लागला आहे. सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी असामान्य कामगिरी करण्यासाठी तत्पर असणार्या भाजपच्या कार्यकर्त्यांवरचा नागरिकांचा विश्वास सध्या दृढ होताना दिसत असून आगामी काळात हाच विश्वास राष्ट्रवादीसाठी तगडे आव्हान ठरू शकतो.
वाघोलीत कार्यकारिणी निवड
भाजपा युवा मोर्चा पुणे जिल्हा आणि शिरूर आणि हवेली मंडल कार्यकारिणी नियुक्ती कार्यक्रम वाघोली येथे संपन्न झाला. राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यावेळी उपस्थित होते. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, माजी आमदार बापूसाहेब पठारे, रोहिदास उंद्रे, क्रीडा विभागाचे राज्याचे अध्यक्ष संदीप भोंडवे, युवा मोर्चा पदाधिकारी गणेश कुटे, निवेदिता एकबोटे माजी जिल्हा परिषद सदस्य रामदास दाभाडे, युवा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप सातव, शिरूर मंडल अध्यक्ष आबा सोनवणे, हवेली मंडल अध्यक्ष शामराव गावडे, जिल्हा सरचिटणीस संजय रौंधळ, महिला मोर्चा अध्यक्ष पुनम चौधरी यांचे सह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते अतिशय मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर गावोगावी भाजपच्या वातावरणाची जोरदार चर्चा होऊ लागली आहे.
महाराष्ट्र केसरीतून शक्तीप्रदर्शन
काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे आयोजन प्रदीप कंद, संदीप भोंडवे यांनी करून क्रीडाप्रेमींची मने जिंकली आहेत. विविध गावच्या लहान मोठ्या समस्या तसेच अनेक भागातील दुर्लक्षित प्रश्न सोडवण्यासाठी देखील हीच मंडळी प्रयत्न करताना दिसत असून त्यामुळे भाजपचा एक वेगळा चेहरा विकासाच्या वाटेवर आपला ठसा उमटून जात आहे.