लासुर्णे-वालचंदनगर जिल्हा परिषद गटात इच्छुकांचा संपर्कावर भर
निमसाखर- मिनी विधानसभा म्हणून ओळख असणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या गट आणि गणांच्या नव्याने रचना झाले आहेत. यासाठी इच्छुकांच्या धार्मिक कार्यक्रम अथवा चहापानच्या माध्यमातून गावोगावी संपर्क, संवाद साधला जात आहे. नव्या गट-गण रचनेनुसार राष्ट्रवादीबरोबर भाजपही तोडीस तोड उमेदवार देण्यास सज्ज झाला आहे.
करोना संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव कमी होतोय ना होतोय, याच काळात ओबीसींचे आरक्षणाबाबतचा प्रश्न सरकारपुढे आला. या संदर्भात न्यायालयीन आदेशाचे पालन होत जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यात आली. यामध्ये पुणे जिल्हा परिषद व त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांच्या कार्यकाळ गेली काही महिन्यापूर्वी संपला होता. त्यापूर्वीच या ठिकाणी प्रशासक म्हणून त्या ठिकाणचे अधिकारी काम पाहत आहेत.
पूर्वीचा निमगाव केतकी – निमसाखर या गटावर पूर्वीची कॉंग्रेस आत्ताची भाजप गटाचे वर्चस्व होते; मात्र नव्याने झालेल्या गट आणि गणाची रचना झाली असून यामध्ये लासुर्णे-वालचंदनगर हा गट झाला आहे. यामध्ये निमसाखर, निरवांगी, दगडवाडी व घोरपडवाडी ही गावे येत आहेत. याचबरोबर लासुर्णे गणा अंतर्गत कळंब, कर्दनवाडी, परिटवाडी, चव्हाणवाडी, बंबाडवाडी आणि चिखली ही गावे येतात. यामुळे वालचंदनगर, लासुर्णे या जिल्हा परिषद गटामध्ये राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये रस्सीखेच पाहावयास मिळेल, अशी ग्रामस्थांमधून चर्चा आहे.
उमेदवारीसाठी प्रयत्न
जिल्हा परिषद, पंचायत समिती या मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जात असून अनेक राजकीय कार्यकर्ते गेले काही महिन्यांपासून “गुडघ्याला बाशिंग बांधलं’ याप्रमाणे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. काही कार्यकर्ते निवडणुका डोळ्यासमोर ठेवून गेले तीन महिन्यापासून तयारीला सुरुवात केली आहे. यासाठी सर्वसामान्यांमध्ये मिसळत चहा पाजणे, नाष्टा सांगणे या बाबी होताना दिसत आहेत. तर काही मंडळी धार्मिक कार्यक्रम घेऊन मोठ्या प्रमाणावर परिसरातील नागरिक जेवणावळीसाठी कसे येतील हा दृष्टीकोन ठेवून जिल्हा परिषद, पंचायत समिती आपल्यालाच कशी मिळेल, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
सक्षम उमेदवाराचा शोध
कधी नव्हे पंचायत समितीच्या निमित्ताने राजकीय मंडळी आता चौकाचौकात गर्दी करून बसू लागले आहेत. तर काही राजकीय मंडळी गर्दी करण्यापेक्षा सर्वसामान्यांच्या अडचणी समजावून घेत प्रश्न कसे सोडवता येतील, या दृष्टिकोनातून प्रयत्न होताना दिसत आहेत. यामुळे यंदाच्या नव्याने गट तयार झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि भाजप देखील नवख्या तरूण कार्यकर्त्या बरोबरच स्वच्छ प्रतिमेचा व तितका सक्षम कार्यकर्त्याच्या शोधात असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. लासुर्णे-वालचंदनगर या जिल्हा परिषद गट आणि गणांमध्ये असे कार्यकर्ते कोण याची चर्चा सुरू आहे.