मुढाळे पंचायत समितीत हवा तापली : मोठ्या गावात संधी मिळणार?
मोरगाव – बारामती तालुक्यातील मुढाळे पंचायत समिती गणामध्ये आगामी होणारी निवडणुकीची चर्चा चांगलीच रंगली आहे. मुढाळे हा जिरायती भागातील गावांचा नवीन गण निर्माण झाला असल्याने या गणातील गावांमध्ये यंदा पंचायत समितीची उमेदवारी मिळणार आहे.
या गणांत 10 गावे व वाड्या- वस्त्यांचा समावेश असली तरी मोठ्या गावांतील मतदारांवर विजयाचे गणित ठरले जाणार आहे. यामुळे राष्ट्रवादीबरोबरच निवडणुकीसाठी रिंगणात उतरणारे इतर विरोधक पक्ष मोठ्या गावातील कार्यंकर्त्यांस संधी देण्याची शक्यता आहे. तर भाजपाप्रमाणे शिवसेनेचेही कडवे आव्हान देऊन रिंगणात उतरण्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे.
मोरगाव -वडगांव निंबाळकर या जिल्हा परिषद गटाची विभागणी होऊन केवळ जिरायती भागातील गावांचा मोरगाव- मुढाळे हा गट निर्माण झाला आहे. मुढाळे गणामध्ये माळवाडी लोणी, कऱ्हावागज, भिलारवाडी, जळगाव कडेपठार, सायंबाचीवाडी, लोणी भापकर, ढाकाळे, मुढाळे, खामगळवाडी, जळकेवाडी ही गावे आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे याही गणामध्ये चांगलेच प्राबल्य आहे. यामध्ये भाजपाचे तगडे उमेदवार उभे केले जाण्याची शक्यता असल्याने यंदा कांटे की टक्कर पहावयास मिळणार आहे. तर या गणात शिवसेना घरोघरी पोहोचली आहे. यामुळे तीन पक्षाचे पॅनल होण्याची चिन्हे आहेत.
गेल्या पंचवार्षिक निवडणुकीला सर्वसाधारणसाठी आरक्षण गेले होते. तर येणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये आरक्षणाचा मुद्दा अद्याप अनुत्तरितच आहे. यामुळे या गणातील युवा व ज्येष्ठ उमेदवार गुडघ्याला बाशिंग लावून आहेत. या उमेदवारांची चर्चा आहे. गणातील या गावात पिण्याचे पाणी, रस्ते, शाळा, सभामंडप हे विकासाचे मुद्दे राष्ट्रवादीकडे असले तरी शेती सिंचन , रोजगार या महत्त्वाच्या मुद्द्यांवर विरोधक निवडणूक रिंगणात उतरण्यासाठी ठोस मुद्दे हाती आहेत. त्यामुळे गणात कोणते मुद्दे प्रभावी ठरतात, याकडे लक्ष लागले आहे.
आगामी पंचायत समिती निवडणुकीत शिवसेना निवडणुकीसाठी सज्ज आहे. प्रत्येक गावांत शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र, निवडणूक महाविकास आघाडीबरोबर लढायची की स्वतंत्र हा निर्णय पक्षप्रमुख घेणार आहे. त्याप्रमाणे अंमलबजावणी केली जाईल.
– राजेंद्र काळे, शिवसेना सहसंप्रर्क प्रमुख पुणे जिल्हा.