भाविकांसाठी मनोरंजनाचे कार्यक्रम : महिलांसाठी होम मिनिस्टर, होम यज्ञ
डोर्लेवाडी – झारगडवाडी (ता. बारामती) येथील गावामध्ये शारदीय नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. या ठिकाणी सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने भरदास्त कार्यक्रमाचे आयोजन नऊ दिवस होत असते.
पहिल्या माळेपासून ते नवव्या माळेपर्यंत भाविकांसाठी मनोरंजनाचे कार्यक्रम असतात यामध्ये पोतराजाचा मेळा, स्वर चंदन गाण्याचा कार्यक्रम, रेखा गेजगे यांचा गायन पार्टीचा कार्यक्रम, स्थानिकांसाठी डान्स स्पर्धा, जय भवानी आराधी वाळकी देलवडी मंडळाचा कार्यक्रम, खास महिलांसाठी होम मिनिस्टर, होम यज्ञ आणि स्थानिक आराधी मंडळ यांचा गाण्याचा कार्यक्रम, शेवटच्या दिवशी गट विसर्जनाचा कार्यक्रम आणि विजयादशमीच्यादिवशी देवीचा छबिना म्हणजेच काठीची भव्य मिरवणूक गावातून काढली जाते असे नऊ दिवस झारगडवाडी येथील भवानी माता मंदिरामध्ये सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ यांच्यावतीने कार्यक्रम राबविण्यात आले आहेत. नवरात्रीनिमित्त मंदिराला मोठ्या प्रमाणात विद्युतरोषणाई केल्याने मंदिर प्रकाशाने उजळून निघाले आहे.
झारगडवाडी येथील भवानीमातेचा मंदिर 100 वर्षापासून असल्याचे वडीलधाऱ्यांकडून सांगितले जाते. तरवाडाच्या बुडामध्ये भवानी मातेची मूर्ती दिसून आली. पूर्वीच्या माणसाने त्या ठिकाणी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून छोटसं मंदिर उभारले. यानंतर पूजा अर्चा झाल्यानंतर हळूहळू त्याच जागेवर गावकऱ्यांनी लोकवर्गणी करून भव्य मंदिर उभारले आहे.
ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सुविधा
नवरात्री उत्सवानिमित्त गावातील भवानी माता मंदिराकडे येणाऱ्या रस्त्यावरील झाडे झुुडपे ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आली तसेच रस्त्यावर मुरूम टाकण्यात आला. त्यामुळे भाविकांकडून या निर्णयाचे स्वागत होत आहे. बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक राजेंद्र बोरकर, झारगडवाडी गावचे सरपंच अजित बोरकर, सदस्य अजित बुरुंगले, तंटामुक्तीचे अध्यक्ष गोरख बोरकर, संतोष मासाळ, रामभाऊ करे यांनी पुढाकार घेतला.