मंचर -अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील नाना-नानी पार्क ज्येष्ठ नागरिकांसाठी असले तरी सद्यःस्थितीत ही जागा दारूपार्टी, गांजा ओढणाऱ्या नशेबाज तरुणांचा अड्डा बनली आहे. ज्येष्ठ नागरिकांना शिवीगाळ करण्याचा प्रकारही येथे नुकताच घडला आहे. मंचर पोलिसांनी अज्ञात तरुणांचा शोध घेऊन संबंधितावर कडक कारवाई करावी, अशी मागणी ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने होत आहे.
आंबेगाव तालुक्यातील पाच एकर जागेत असलेले एकमेव नाना-नानी पार्क अवसरी बुद्रुक ग्रामपंचायतीच्या मागे आहे. सुमारे 35 ते 40 लाख रुपये खर्च करून ग्रामपंचायतीच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांना फिरण्यासाठी हे पार्क उभारण्यात आले.
महादेव मंदिर परिसरात पाच एकर रिकाम्या जागेत ज्येष्ठ नागरिकांसाठी जॉगिंग ट्रॅक आणि तरुणांसाठी ओपन जिम उभारून चांगली सोय केली आहे. पाच एकर जागेत संरक्षक भिंत, जागा सुधारणा, व्यायाम साहित्यही करण्यात आले आहे. पहाटे व संध्याकाळी ज्येष्ठ नागरिक आणि महिला येथे फिरण्यासाठी व व्यायामासाठी येतात.
स्थानिक तरुण सायंकाळी चारनंतर क्रिकेट, व्हॉलीबॉल, व्यायामासाठी येथे येतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून अज्ञात तरुण या पार्कचा उपयोग दारू पार्टी,गांजा ओढण्यासाठी करीत असल्याच्या तक्रारी ज्येष्ठ नागरिकांकडून आल्या आहेत. हे ज्येष्ठ नागरिक संबधित तरुणांना समजावण्यासाठी गेले असता त्यांना दमदाटी व शिवीगाळ केल्याने येथे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबरोबरच या पार्कमध्ये मोठ्या प्रमाणात गवत वाढले असून, अस्वच्छता आढळून येत आहे. नशेबाज तरुणांचा मंचर पोलिसांनी शोध घेऊन कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी येथे येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनी केली आहे. गावातील स्मशानभूमीत देखील असेच उद्योग चालत असल्याच्या तक्रारी ग्रामस्थ करत आहेत.