राजकीय इव्हेंट केल्याची खासदार डॉ. कोल्हे यांची टीका
लोणीकंद – ज्या स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाचा विकास होतो आहे, त्यांचा फोटो कुठल्याही फ्लेक्सवर, जाहिरातींवर नसावा हा तमाम शंभुभक्तांचा, त्यांच्या भावनांचा अपमान आहे, अशा तीव्र शब्दांत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी या भूमिपूजन सोहळ्याचा राजकीय इव्हेंटवर टीका केली.
वढु बुद्रुक आणि तुळापूर येथील शौर्यतीर्थावर भूमिपूजन पार पडल्यानंतर तुळापूर येथे आयोजित जाहीर कार्यक्रमातून निघून जात खासदार डॉ. कोल्हे आणि आमदार अशोकबापू पवार यांनी नाराजी व्यक्त केली.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या विकासासाठी भूमिपूजन सोहळा आयोजित केल्याबद्दल खासदार डॉ. कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि मुख्यमंत्र्यांचे आभार मानताना गेली 334 वर्षे ही समाधी, हे स्मारक या ठिकाणी असल्याची आठवण करुन देताना काही लोकं 15 वर्षे या भागाचे खासदार होते.
स्वतः अजितदादा साडेतेरा वर्षे पालकमंत्री होते. त्यावेळी या स्मारकाचे काम का झाले नाही, असा सवाल खासदार डॉ. कोल्हे यांनी केला. 2019 नंतर मी आणि आमदार अशोकबापू पवार यांनी सातत्याने या समाधी स्थळाचा विकास व्हावा यासाठी मागणी व पाठपुरावा सुरू केला, त्यानंतर आता निवडणुकीच्या तोंडावर हे भूमिपूजन होत आहे, यासाठी मी मनापासून आभारी आहे.
कोनशिलेवरून पदाधिकारी गायब
भूमिपूजन प्रसंगी लावण्यात आलेल्या कोनशिलेवर खासदार अमोल कोल्हे, आमदार अशोक पवार, श्री क्षेत्र वढूच्या सरपंच अंजली शिवले, श्री क्षेत्र तुळापूरच्या सरपंच गुंफा इंगळे यांचे नावच नसल्याने कार्यकर्ते व स्थानिक पदाधिकारी नाराज झाल्याचे पाहायला मिळाले.