शिक्रापूर : कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक विजयस्तंभ येथे शौर्यदिनी शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी अभिवादन केले. यावेळी त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या.
त्यांनी सोशल मीडियावर भावना व्यक्त करताना विजयस्तंभ केवळ एका सैन्याचा दुसऱ्या सैन्यावरील विजय नव्हे, तर बलाढ्य शक्तिवर दुर्दम्य इच्छाशक्तीचा विजय असून व्यवस्थेवर जनतेचा विजय, प्रस्थापितांवर शोषितांचा विजय चिरकाल अजरामर करणारी ही ऐतिहासिक शौर्यभूमी आहे.
याठिकाणी नतमस्तक होऊन पराक्रमाचा सुवर्ण इतिहास लिहिणाऱ्या सर्व वीरांना अभिवादन करत संघर्षाची प्रेरणा घेऊन अन्यायाच्या विरोधात सातत्याने लढण्याचा संकल्प केला असल्याचे कोल्हे यांनी सांगितले आहे.