पुणे – राज्याच्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अॅप्लिकेशन सेंटर (एमआरसॅक) यांच्यासोबत करार केला आहे. ‘एमआरसॅक’ यांच्याकडे राज्यातील गावनिहाय उपलब्ध असलेल्या गट नंबर निहाय जीआयएस नकाशे रेडी-रेकनरची लिंक करण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे शहर व गावातील सरकारी, खासगी जागांचे रेडी-रेकनरमधील दर जिओ पोर्टलवर एका क्लिकवर पाहावयास मिळणार आहे.
शहर, गाव, तालुका निहाय जमिनींचे रेडी-रेकनरमधील दर मिळावेत, यासाठी हे पोर्टल विकसित करण्यात आले आहे. त्यासाठी तीन टप्पे करण्यात आले आहेत. शहर, शहरालगतचे प्रभाव क्षेत्र आणि ग्रामीण भाग, असे हे तीन टप्पे आहेत. ‘एमआरसॅक’ची मदत घेऊन त्यांच्याकडील नकाशे आणि रेडी-रेकनरमधील दर यांचे एकत्रीकरण यात आहेत. आतापर्यंत राज्यातील शहर महापालिका असलेल्या २२ जिल्ह्यांचे रेडी-रेकनर अपलोड करण्याचे काम झाले आहे. उर्वरित १३ जिल्ह्यांची माहिती अपडेट करण्याचे काम बाकी आहे. येत्या वर्षात हे काम पूर्ण होईल, असे नोंदणी मुद्रांक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.