पारगाव – केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची दिल्ली येथे भेट घेऊन पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्ग तसेच न्हावरा – केडगाव चौफुला रस्त्याच्या संबंधित विविध समस्यांवर चर्चा तसेच दौंड तालुक्यातील विविध रस्त्यांच्या कामांसाठी केंद्रीय रस्ते निधी मिळावा, अशी मागणी केली केल्याचे दौंडचे आमदार राहुल कुल यांनी सांगितले. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गवरील हडपसर ते कासुर्डी टोलनाक्यापर्यंत उन्नत महामार्ग उभारण्यासंदर्भात प्रस्तावास मान्यता देऊन सदर कामाची निविदा प्रक्रिया राबविण्यात यावी.
पुणे सोलापूर महामार्गावरील यवत, भांडगाव, वाखारी, चौफुला, वरवंड, पाटस, मळद, खडकी, स्वामी चिंचोली येथे ठीकठिकाणी सर्व्हिस रोडचे काम करण्याबाबत मागणीनुसार महामार्ग प्राधिकरणाद्वारे तयार करण्यात आलेल्या प्रस्तावास मान्यता देण्यात यावी व सेवा रस्त्याची कामे सुरू करण्यात यावीत. रस्ते सुरक्षिततेच्या दृष्टीने पुणे सोलापूर महामार्गावरील वाखारी, धायगुडेवाडी, भागवतवाडी तसेच कुरकुंभ येथील धोक्याची व अपघात प्रवण क्षेत्र निश्चित करून त्यावर कार्यवाहीसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारे प्रस्ताव तयार करण्यात आलेल्या प्रस्तावास मान्यता देण्यात यावी.
न्हावरा-केडगाव चौफुला रस्त्याचे रुंदीकरण आणि विस्तारीकरणाचे काम जलद गतीने पूर्ण करावे, पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वरवंड येथे अतिरिक्त अंडरपास बांधावा, केंद्रीय रस्ते निधीद्वारे पुणे-सोलापूर रेल्वे मार्गावर खोरोडी येथे (रेल्वे अंडर ब्रीज) उभारण्यात यावा, आदी मागण्या केल्या आहेत. या मागण्यांची दखल घेत केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन दिल्याचे आमदार कुल यांनी सांगितले. यावेळी माढाचे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, माण खटावचे आमदार जयकुमार गोरे उपस्थित होते.