जुन्नर – भारताचा स्वातंत्र्यदिन भारतीय सैन्यदल आणि महाराष्ट्रातील गिर्यारोहक यांच्याकडून गडकिल्ल्यांवर उत्साहात साजरा करण्यात आला. भारतीय सैन्यदलाच्या सदर्न कमांडतर्फे आगळ्यावेगळ्या उपक्रमात यंदा स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्ट रोजी सदर्न कमांडच्या आखत्यारीत येणाऱ्या राज्यांपैकी 6 राज्यांमधील 75 गडकोटांवर एकाचवेळी तिरंगा फडकावला. त्यापैकी 47 गडकिल्ले हे महाराष्ट्रातील होते.
साहस आणि देशप्रेमाने भारलेल्या अशा एका अनोख्या उपक्रमात भारतीय सेनादलातील अधिकारी व जवानांबरोबर छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गडांवर जाऊन तिरंगा फडकवण्याचा व स्वातंत्र्यदिन साजरा करण्याचा अनुभव अनेक साहसप्रेमींनी घेतला. सैन्यदलातील 650 पेक्षा अधिक जवानांबरोबर महाराष्ट्रातील 500 पेक्षा अधिक दुर्गप्रेमींनी सहभाग घेतला.
उपक्रमाचे समन्वय करण्यासाठी महाराष्ट्रातील आघाडीच्या “गिरिप्रेमी’ गिर्यारोहण संस्थेने सदर्न कमांडला सहकार्य केले. उपक्रमाला महाराष्ट्रातील गिर्यारोहकांनी प्रतिसाद दिला. महाराष्ट्रातील 47, तर तेलंगणा, कर्नाटक, गोवा आणि तेलंगणा येथील प्रत्येकी एक अशा एकूण 50 गडकोटांवर सैन्यदलातील जवान व साहसप्रेमींनी एकत्र येऊन तिरंगा फडकावण्याचा हा अनोखा उपक्रम प्रथमच केला होता.
गिरिप्रेमी संस्थेतील गिर्यारोहकांनीही या उपक्रमात सहभाग घेत पुण्याच्या आसपासच्या किल्यांवर सैन्यदलाच्या जवानांबरोबर स्वातंत्र्यदिन साजरा केला. संस्थेच्या आगामी महिलांच्या माऊंट सुदर्शन मोहिमेच्या संघाने रोहिडा किल्ल्यावर तर माऊंट मेरु मोहिमेच्या संघाने पुरंदर किल्ल्यावर तिरंगा ध्वज फडकवला. यावेळी संस्थेच्या संस्थापिका उषःप्रभा पागे, अध्यक्ष जयंत तुळपुळे, अष्टहजारी मोहिमांचे नेते उमेश झिरपे या सर्व गिर्यारोहकांनी सहभाग घेतला. ऐतिहासिक महत्त्व असणाऱ्या किल्ल्यांची माहिती व इतिहास भारताच्या विविध भागातून आलेल्या सैन्यदलातील जवानांना सांगण्याची व हे किल्ले दाखवण्याची संधी सर्व सहासप्रेमींना मिळाली. पहाटे विविध किल्ल्यांच्या पायथ्याला सर्व साहसप्रेमींनी, शाळकरी मुले, वृद्ध, माजी सैनिक आलेल्या जवानांचे स्वागत केले. साहसप्रेमी व जवानांनी सर्व किल्ल्यावर चढाई करत ध्वजारोहण केले.
ध्वजारोहण झालेल्या किल्ल्यांची यादी
पांडवगड, वैराटगड, चंदनगड, वंदनगड, प्रतापगड (सातारा जिल्हा); हडसर, जीवधन, चावंड, शिवनेरी, भोरगिरी, पुरंदर, तोरणा, राजगड, विसापूर, लोहगड, सिंहगड, तिकोना, कोरीगड, तुंग, रोहिडा (पुणे जिल्हा); दौलताबाद, अंतुर (छत्रपती संभाजीनगर जिल्हा); सामानगड, महिपालगड, विशाळगड, पन्हाळा (कोल्हापूर जिल्हा); माहुली (ठाणे जिल्हा); प्रबळगड, रायगड (रायगड जिल्हा); हातगड, मार्कंड्या, रावळा, जवळा, धोडप, रामशेज, राजदेहेर, चांदवड, भास्करगड, ब्रह्मगिरी, देहेरगड, रांजणगिरी (नाशिक जिल्हा); अहमदनगर, रतनगड, बितनगड, कलाडगड, विश्रामगड, हरिश्चंद्रगड (अहमदनगर जिल्हा), राजहंस गड (कर्नाटक), चपोरा किल्ला (गोवा), वारंगळ किल्ला (तेलंगणा).