लोणीकंद : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध मतदारसंघांच्या प्रमुखांची निवड करण्यात आली आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रमुखपदी भोसरी चे आमदार महेश लांडगे यांची तर शिरूर-हवेली विधानसभा मतदार संघाच्या प्रमुख पदी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रदीप कंद यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
भाजपने मिशन 2024 मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप कुणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं असताना भाजपने संपूर्ण पुणे जिल्ह्याची तयारी सुरु केली आहे. पुणे जिल्ह्यातील तिन्ही मतदार संघाची जबाबदारी वाटण्यात आली आहे.
पुण्यातील तीन लोकसभा मतदारसंघावर भाजपने विशेष लक्ष केंद्रीत केले असून पुणे लोकसभा मतदारसंघाची निवडणूक प्रमुख म्हणून मुरलीधर मोहोळ यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे तर बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी पुन्हा राहुल कुल यांच्याकडे दिलेली असून शिरूर लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी महेश लांडगे यांच्यांकडे दिली आहे. हे तिघेही लोकसभा मतदारसंघातील संभाव्य उमेदवार मानले जातात. मात्र निवडणूक प्रमुख पदाची जबाबदारी मिळाल्यानंतर उमेदवारी त्यांनाच मिळणार का ? यावर मात्र प्रश्नचिन्ह आहे.
शिवसेनेच्या तत्कालीन बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी चे वर्चस्व
जुन्नर, आंबेगाव, खेड-आळंदी, शिरूर, भोसरी अन् हडपसर विधानसभा मतदारसंघ शिरुर लोकसभा मतदार संघात येतो. २००९ पासून या ठिकाणी शिवसेनेचे वर्चस्व होते. परंतु २०१९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेना चे उमेदवार शिवाजी आढळराव यांचा पराभव करत शिवसेनेकडून ही जागा घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल कोल्हे या ठिकाणी खासदार झाले.
भाजपात प्रदीप कंदांचा उंचावतोय आलेख
2019 च्या विधानसभा निवडणुकी पासून प्रदीप कंदांनी पुणे जिल्ह्यात मनापासून भाजपा वाढवण्याचे काम केले. PMRDA च्या निवडणुकीत हवेली तालुक्यातील भाजपचे उमेदवार निवडून आणत pdcc बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या मातब्बर उमेदवाराला धोबीपछाड देत राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजप ची एन्ट्री केली. भाजप च्या या यशाने पक्षश्रेष्ठी खुश झाल्यानंतर कंदांच्या नेतृत्वाखाली झालेल्या पुणे बाजार समिती च्या निवडणुकीत भाजपने एकहाती सत्ता मिळवली.. या सर्व निवडणुकांत प्रदीप कंद यांनी आपला करिष्मा दाखवल्यामुळे च भाजपा मध्ये प्रदीप कंद यांचा आलेख उंचावत असल्याचे बोलले जात आहे.