लोणी काळभोर – पेरणे फाटा येथील शौर्यदिनाच्या पार्श्वभूमीवर कुंजीरवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील थेऊर फाटा ते पेरणे फाटा (भीमा कोरेगाव) हा रस्ता रविवारी (दि.३१) दुपारी दोन वाजल्यापासून पुढील ३४ तास अवजड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा असे आवाहन लोणी काळभोर वाहतूक विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन शिंदे यांनी केले आहे.
थेऊर फाट्याकडून लोणी कंदच्या दिशेने जाणारी अवजड वाहतूक बंद केली आहे. या मार्गावरून फक्त विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी आलेल्या भीम अनुयायांच्या गाड्या व स्थानिक नागरिकांच्या घरगुती प्रवासी गाड्या जातीत. या मार्गावरील अवजड वाहनांसाठी बंद केलेली वाहतूक वळविण्यात आलेली आहे. ती हडपसर, मगरपट्टा, खराडी बायपास मार्गे विश्रांतवाडी येथून पुढे आळंदी व चाकणमार्गे पुढे जाईल.
प्रशासनाने थेऊर फाटा ते पेरणे फाटा हा रस्ता रविवारी (दि. ३१) दुपारी दोन वाजल्यापासून सोमवारी (दि. १) मध्यरात्री १२ वाजेपर्यंत असा तब्बल ३४ तास अवजड वाहतुकीसाठी बंद केला आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुभाष काळे, सहायक पोलीस निरीक्षक किशोर पवार, उपनिरीक्षक हनुमंत तरटे, विकास जगदाळे, हवालदार केतन धेंडे, राजेश दराडे व त्यांचे सहकारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.
लोणी काळभोर वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन शिंदे, आनंद साळुंखे, ज्ञानोबा बडे, बापूराव बांगर व सहकारी वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवत आहेत. लोणी काळभोर पोलिसांचा २० जणांचा ताफा व वाहतूक शाखेच्या २० पोलिसांचा ताफा थेऊर फाटा येथे दिवस व रात्रपाळी असे कर्तव्य बजावणार आहे.