पिंपरी – शंभरावे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन ६ व ७ जानेवारीला पिंपरी -चिंचवडमध्ये होत असून या शतक महोत्सवी नाट्य संमेलनाचे नेपथ्य (कला दिग्दर्शक) राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ नेपथ्यकार श्याम भूतकर करत आहेत, अशी माहिती नाट्य संमेलनाचे आयोजक भाऊसाहेब भोईर यांनी दिली.
गेली ४० वर्षे नाट्य सृष्टीत कार्यरत असणारे श्याम भूतकर हे नाट्यकलावंत असून वेशभूषा, सेट डिजायनिंग, पेटींग आदी क्षेत्रात ते कार्यरत आहे. ‘पुरूषोत्तम करंडक’ पासून सुरू झालेली त्यांची कारकीर्द हिंदी, मराठी नाटक, चित्रपट अशी आहे. त्यांनी ज्येष्ठ अभिनेते नसरुद्दीन शहा, शाबाना आजमी, अनुपम खेर, अशोक सराफ, दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल आदी दिग्गज कलाकारांच्या चित्रपट व नाटकांच्या नेपथ्याची जबाबदारी सांभाळली आहे.
1985 साली श्याम भुतकर यांना ‘रावसाहेब’ या मराठी चित्रपटासाठी ‘उत्तम कला दिग्दर्शक’ चा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आहे. जवळपास ४० वर्ष नाट्यक्षेत्रात कला दिग्दर्शक म्हणून काम केल्यानंतर मागील काही वर्षांपासून त्यांनी कला दिग्दर्शनाचे आपले काम थांबवले होते. मात्र, शंभराव्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या नेपथ्य उभारणी साठी आयोजक भाऊसाहेब भोईर यांनी त्यांना विचारलं असता त्यांनी आनंदाने होकार दिला.