पुणे जिल्हा: लोणी काळभोर, कदमवाकवस्ती हद्दीतील सूचना, हरकती द्या

लोणी काळभोर  -पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने हवेली तालुक्‍यातील लोणी काळभोर व कदमवाकवस्ती दोन्ही ग्रामपंचायतींच्या हद्दीत विकासकामे राबविण्यात येणार आहेत. त्यामुळे विकास आराखडा तयार करण्यासाठी नागरीकांकडून दोन महिन्यांत सूचना व हरकती मागवण्यात आल्या आहेत. याबाबत प्राधिकरणाचे आयुक्‍त तथा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी सूचना प्रसिद्ध केली आहे.

पुणे शहरा भोवतालच्या परिसराचा नियोजनबद्ध विकास व्हावा म्हणून पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. जिल्ह्यातील मावळ, हवेली, मुळशी, पुणे शहर या तालुक्‍यांचे पूर्ण क्षेत्र तसेच वेल्हा, पुरंदर, दौंड या तालुक्‍यांतील काही भागांकरिता हे प्राधिकरण तयार करण्यात आले आहे. यामध्ये पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, तळेगाव दाभाडे, लोणावळा, आळंदी, शिरूर, चाकण, राजगुरुनगर, सासवड या नगरपालिका आणि पुणे, देहूरोड व खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड यांचा समावेश नाही.

1969 पासून लोणी काळभोर व कदमवाकवस्ती ही दोन गावे पुणे जिल्हा परिषदेच्या अंतर्गत होती. या दोन्ही गावांच्या विकास योजनेबाबत 1975 मध्ये राज्य सरकारने आदेश काढला होता. परंतु या आदेशाची अंमलबजावणी झाली नव्हती. लोणी काळभोर व कदमवाकवस्ती गावांचा एकसंघ विकास होण्याच्या या संदर्भातील नियोजन व विकास प्राधिकरणाच्या वतीने करण्यात यावा, असे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.

त्यामुळे लोणी काळभोर व कदमवाकवस्ती गावांच्या महसुली क्षेत्राची विकास योजना तयार करण्यासाठी जनतेकडून सूचना व हरकती मागविण्यात येत आहेत. या सूचना महानगर आयुक्‍त तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, स. क्र. 152-153, महाराजा सयाजीराव गायकवाड उद्योग भवन, चौथा मजला, औंध, पुणे या पत्त्यावर साठ दिवसांच्या आत पाठवाव्यात.

लोणी काळभोर व कदमवाकवस्ती गावांचे भागशः महसुली क्षेत्र दर्शविणारा नकाशा पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यालयात कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी जनतेच्या निरीक्षणासाठी ठेवण्यात आलेला आहे, अशी माहिती डॉ. सुहास दिवसे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.