अजूनही वावर असल्याने वनखात्याने पिंजरा लावण्याची मागणी
मंचर – कळंब (ता. आंबेगाव) येथे वनखात्याने लावलेल्या पिंजऱ्यात परिपक्व झालेला अंदाजे दीड ते दोन वर्षाचा नर जातीचा बिबट्या शनिवारी (दि. १६) पहाटे जेरबंद झाला आहे. तेथे बिबट्याचा अजूनही वावर असल्याने वनखात्याने पिंजरा लावून इतर बिबट्यांना जेरबंद करावे, अशी मागणी लोकनियुक्त सरपंच उषा सचिन कानडे यांनी केली आहे .
कळंब येथील चांडोली पावर हाऊस जवळील द्राक्ष बागायतदार ग्रामपंचायत सदस्य केतन कहडणे यांच्या शेत आणि परिसरात बिबट्याचा वावर असल्याने गेल्या पंधरा दिवसानंतर भीतीचे वातावरण पसरले होते. तेथे वनविभागाने पिंजरा लावावा, अशी मागणी सरपंच उषा कानडे यांनी वाविभागाकडे केली होती. त्यानुसार घटनास्थळी वनपाल शशिकांत मडके यांनी पाहणी करून या ठिकाणी बिबट्याचे पंजे आढळल्यानंतर त्या ठिकाणी पिंजरा लावला.
घटनास्थळी बिबट्याला जेरबंद केल्यानंतर ही माहिती वनपाल शशिकांत मडके आणि वनमजूर जालिंदर थोरात शेतकरी अनिल भालेराव आणि अमित भालेराव यांनी कळवली. या बिबट्याला अवसरी येथील वनउद्यानात तपासणीसाठी नेण्यात आले असून, माणिकडोह जुन्नर येथील केंद्रात सोडल्यानंतर पिंजरा मोकळा झाल्यानंतर रविवारी किंवा सोमवारी वस्तीवर पुन्हा पिंजरा लावण्यात येणार आहे. असे वनविभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
अजूनही तीन बिबटे मोकाट
या परिसरात अजूनही नर, मादी आणि बिबट्याचे पिल्लू असे तीन बिबटे मोकाट असून त्यांना लवकरात लवकर जेरबंद करणे गरजेचे आहे. त्यामुळे या ठिकाणी वन विभागाने पिंजरा लावावा. अशी मागणी सरपंच उषा कानडे यांनी केली .