कोथरूड – नवीन खेळण्यांना काटेरी झुडपांनी घातलेला विळखा, जाॅगिंग ट्रॅकवरील अस्वच्छता, घाणीचे साम्राज्य आणि अपूर्ण अवस्थेतील काम, यामुळे उद्यान लहान मुलांचा किलबिलाट आणि रंगबिरंगी फुलांनी फुलण्याअधीच कोमजले. याला जबाबदार कोण? काम पूर्ण करता येत नसेल तर सुरू करताच कशाला असा संतप्त प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला.
भुसारी काॅलनीतील सर्व्हे क्रमांक 98 मध्ये सोसायटीच्या ओपन स्पेशमध्ये उद्यानाचे आरक्षण टाकले आणि लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नातून याठिकाणी उद्यान उभारण्याच्या कामाला सुरवात झाली. जाॅगींक ट्रॅक तयार झाला, लहान मुलांना खेळण्यासाठी झोका, घसरगुंडी यासह अन्य खेळणीही उभारली. मात्र, आज या सर्व उद्यानाला काटेरी झुडपांनी विळखा घातला आहे. खेळणी असूनही खेळता येत नाहीत, जाॅगींग ट्रॅक असूनही त्यावरून चालता येत नाही. याकडे प्रशासनाचे, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष आहे. येथील अस्वच्छता आणि दुर्गंधी यामुळे परिसरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
“सोसायटीच्या ओपन स्पेश जागेवर हे उद्यान उभारले असून, तेही अपूर्ण आहे. सध्या उद्यानाची दुर्दशा झाली असून, त्याकडे प्रशासनाचे लक्षच नाही. जनतेच्या पैसाचा अपव्यय होत असून, उद्यान असून नसल्यासारखे आहे. येथील दुर्गंधीमुळे आणि झाडेझुडपे वाढल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे तात्काळ येथील स्वच्छता करून उद्यानाचे अपूर्ण काम पूर्ण करावे.” – राजाभाऊ जोरी, स्थानिक रहिवासी
“या उद्यानासाठी मुख्य खात्याकडून निधी टाकण्यात आला होता. त्यामुळे काम पूर्ण करण्यासाठी आवश्यक निधीबाबत मुख्य खात्याकडे प्रस्ताव पाठवला आहे. अद्याप त्याबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही.” – केदार वझे – सहाय्यक आयुक्त, कोथरूड-बावधन क्षेत्रीय कार्यालय