गटकळवस्ती परिसरात कुत्र्याची शिकार : शोध मोहीम सुरू
बारामती : शहरातील मेडदपरिसरातील टोयाटो शोरुम मागील गटकळवस्तीवर तीन दिवस बिबट्याचा वावर आढळल्याने या परिसरातील ग्रामस्थात भीतीचे वातावरण आहे. तीन दिवसांपूर्वी एका कुत्र्याची शिकार या बिबट्याने केलेली होती. सलग तीन दिवस शिकार खाण्यासाठी बिबट्या गटकळवस्ती परिसरात येत असल्याची बाब पुढे आली आहे.
दरम्यान, वनविभागाने या परिसरात फिरुन बिबट्याची शोधमोहिम हाती घेतली आहे. चार दिवस बारामती तालुक्यातील खांडज परिसरात देखील बिबट्याचा वावर असल्याची बाब वनपरिक्षेत्र अधिकारी शुभांगी लोणकर यांनी नमूद केली. गटकळवस्तीनजिकच्या सर्व परिसरात वनविभागाच्या वतीने नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. युद्धपातळीवर बिबट्याची शोध मोहिम सुरू असून वनविभागाचे कर्मचारी 24 तास याच कामावर असल्याचे शुभांगी लोणकर यांनी सांगितले.
ग्रामस्थांनी बिबट्याने कुत्रे मारल्याची बाब वनविभागास कळविल्यानंतर कॅमेरे बसविण्यात आले. या कॅमेर्यात बिर्ट्याने कुत्र्याची केलेली शिकार फस्त करण्यासाठी हजेरी लावल्याची बाब उघड झाली. त्यानंतर वनविभागाने हालचाली करत या भागातील लोकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. तीन दिवस बिबट्या दिसला असला तरी शनिवारी (दि. 17) बिबट्या आढळलेला नसल्याने त्याने स्थलांतर केले असावे असा वनविभागाचा अंदाज आहे.
काळजी घ्यावी..
बिबटया वस्तीत घुसल्याने ग्रामस्थांनी पुरेशी काळजी घ्यावी, असे आवाहन वनविभागाने केलेले आहे. शिकारीच्या उद्देशाने हा बिबट्या नागरी वस्तीत घुसला असावा, असा अंदाज आहे. लोकांनी पुरेशी काळजी घ्यावी, असे शुभांगी लोणकर यांनी नमूद केले आहे.