जांबूत : पिंपरखेड (ता. शिरूर) येथील दाभाडे मळा परिसरात बिबट्यांचा मोठ्या प्रमाणावर धुमाकूळ सुरू असून रात्री एकाचवेळी पाच बिबट कळपाने फिरत असल्याचे निदर्शनास आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
मंगळवार (दि.२) भरदिवसा दुपारी साडेतीनच्या सुमारास बिबट्याने शेतात चरत असलेल्या मेंढ्यांच्या कळपातील शेळीवर झडप मारून हल्ला केला. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या शेळीचा मृत्यू झाला.
दाभाडेमळा येथील हनुमान मंदिरा परिसरातील ओढ्यालगत गजानन महादू कोकणे यांचा मेंढ्यांचा कळप चरत होता. यावेळी उसाचे शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक कळपावरती हल्ला चढवण्याचा प्रयत्न करीत एका शेळीवर झडप मारून उसामध्ये ओढत नेले. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या शेळीचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
सोमवारी रात्री साडेसातच्या सुमारास पिंपरखेड- भागडी रस्त्यावर रामहरी काशिनाथ दाभाडे यांना दोन बिबटे आडवे गेले. त्याच ठिकाणी आठ वाजता बापू रामभाऊ दाभाडे हे घरी जाताना रस्त्यावर दोन मोठे व तीन लहान असे पाच बिबटे मोटारसायकलसमोर निदर्शनास आले. एकाचवेळी पाच बिबटे दिसल्याने त्यांनी प्रसंगावधान राखत गाडी थांबवली. यावेळी तीन बिबटे रस्त्याच्या पूर्वेला निघून गेले. मात्र दोन बिबट त्याच ठिकाणी उसाच्या शेतात बसले.