नायगाव – पुरंदर तालुक्यातील नायगाव येथील श्री सिद्धेश्वर महाराज व माता जोगेश्वरी मंदिरात राम नामाच्या गजरात फुलांची झालेली मुक्त उधळण, ओम जो जो रे वटूबाळा, निज निज भैरीवेल्हाळा या गीताने पाळण्याची भक्तीमय सुरुवात, सिद्धेश्वर महाराज की जय, नाथ साहेबांच चांगभलं या जयघोषाने तयार झालेले मंत्रमुग्ध वातावरण आणि भाविकांच्या उपस्थितीत श्रीक्षेत्र नायगाव येथील श्री सिद्धेश्वर महाराज व माता जोगेश्वरीच्या मंदिरात श्री काळभैरवनाथ जन्मसोहळा नुकताच उत्साहात साजरा झाला.
काळभैरवनाथ अष्टमीनिमित्त श्री सिद्धेश्वर महाराज व माता जोगेश्वरी यांची महापूजा करण्यात आली. देवस्थानचे पुजारी पार्थ जगताप यांनी श्रींची आकर्षक पूजा बांधली. हजारो भाविकांनी श्रींंच्या दर्शनाचा लाभ घेतला. यावेळी रामायणचार्य रामराव महाराज ढोक यांनी काल्याचे कीर्तन केले.
सायंकाळी भजनाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर चांदीच्या सजविलेल्या पाळण्यात उत्सव मूर्ती ठेवून श्री काळभैरवनाथ जन्म सोहळा संपन्न झाला.यावेळी सर्वजण मंत्रमुग्ध होऊन या सोहळ्यात सहभागी झाले होते. अखंड हरिनाम सप्ताहाचे हे 37 वे वर्षे होते. प्रसिद्ध किर्तनकारांची कीर्तने यावेळी झाली.
काकडा व हरिपाठाचे नियोजन सिद्धेश्वर भजनी मंडळाच्या वतीने करण्यात आले. ज्ञानेश्वरी पारायण वाचन करण्यात आले. काल्याचा महाप्रसाद उद्योगपती भानुदास टेकवडे (मुंबई) यांच्या वतीने देण्यात आला.सायंकाळी जन्म सोहळा झाल्यानंतर ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसाद देण्यात आला. ग्रामप्रदक्षिणा घाल्यण्यात आली.