आमदार मेघना साकोरे यांचे केंदूरमध्ये प्रतिपादन
शिक्रापूर – केंदूरसारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठे वैज्ञानिक बनतील. यासाठी विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन जिंतूर – सेलू विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मेघना साकोरे ( बोर्डीकर ) यांनी केले.
केंदूर (ता. शिरूर) येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल व ज्यूनिअर कॉलेज येथे डॉ. सी. व्ही. रमण यांच्या स्मरणार्थ राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. यावेळी आमदार मेघना साकोरे (बोर्डीकर), पोलीस आयुक्त दीपक सोकोरे, आस्थापना आयुक्त पुणे राहुल साकोरे, संस्थेचे विद्या समिती अध्यक्ष श्रीराम साळुंखे, अर्थ सहसचिव सीताराम गवळी, प्राचार्य अनिल साकोरे, वाशी मार्केटचे संचालक सुनिल चौधरी, सर्जेराव डुकरे यांसह आदी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना विज्ञान विषयाचे महत्व कळावे व आवड निर्माण व्हावी तसेच विदयार्थ्यांतून शास्त्रज्ञ घडावेत हा हेतू असल्याचे प्राचार्य अनिल साकोरे यांनी सांगीतले.
विद्यार्थ्यांनी उपलब्ध सुविधा, साहित्याचा वापर करून चांगला अभ्यास करुन आपल्या गाव व विद्यालयाचे नाव उज्वल होईल असे काम करण्याचे आवाहन संस्थेचे विद्या समिती अध्यक्ष श्रीराम साळुख़े यांनी केले. नवी मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त दीपक साकोरे यांनी देखील मार्गदर्शन केले. दरम्यान राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने विद्यालयात स्टेम लॅब अंतर्गत विज्ञान विषयाचे विविध मॉडेल विद्यार्थ्यांनी बनवून मांडले असता उपस्थितांनी त्याचे कौतुक केले.
आयोजित राष्ट्रीय विज्ञान दिनाचे नियोजन व मार्गदर्शन विज्ञान शिक्षक प्रशांत गांजरे, प्रशांत गलांडे, विक्रांत बुटाले, नंदुलाल बहिरम, सारिका पाटील यांनी केले. तर सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश गावडे यांनी केले तर प्रास्ताविक प्राचार्य अनिल साकोरे यांनी केले तर महादेव पाटील यांनी आभार मानले.