नगर – औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय नगरच्या वतीने दि.४ ते ११ मार्च दरम्यान ५३ वा राष्ट्रीय सुरक्षा दिन व सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने एमआयडीसी येथील सर्व कारखान्यांमध्ये सुरक्षितता या विषयावर विविध जनजागृतीचे उपक्रम राबविले जाणार आहेत. सुरक्षा सप्ताहा निमित्त दिनांक गुरवार (दि.७) रोजी एमआयडीसी येथील सिद्धी लॉन्स येथे राष्ट्रीय सुरक्षा दिन साजरा करण्यात येणार असून कामगारांमध्ये औद्योगिक सुरक्षितेवर जनजागृती करण्यात येणार आहे.
कार्यक्रमास पद्मश्री पोपटराव पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी इनायडर इलेक्ट्रिकलचे डायरेक्टर अरविंद पारगावकर हे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे उपसंचालक के. टी. झोपे यांनी दिली.
सुरक्षा दिना निमित्त दि.७ मार्च रोजी सकाळी ८ ते ११ या वेळेत विविध जनजागृती पर उपक्रम राबवण्यात येणार आहेत. यामध्ये आधुनिक सुरक्षितता उपकरणांचे व साधनांचे प्रदर्शन, रक्तदान शिबिर तसेच उपस्थित मान्यवरांचे सुरक्षितता या विषयावर मार्गदर्शन होणार आहे. ‘उत्कृष्ठेसाठी सुरक्षा नेतृत्वावर लक्ष केंद्रित करा’ या थीमवर पोवाडा, पथनाट्य व इतर प्रबोधनचे कार्यक्रम सादर केले जाणार आहेत. या कार्यक्रमासाठी औद्योगिक क्षेत्रातील कर्मचारी, कामगारांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.