राज्यस्तरीय चार पुरस्काराने गौरव
इंदापूर – महाराष्ट्र राज्य इंडियन मेडीकल असोसिएशनच्या वतीने, अमरावती येथे राज्यस्तरीय डॉक्टर परिषद पार पडली. यामध्ये राज्यभर विविध उपक्रम राबविणार्या आयएमएच्या विविध शाखांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. यामध्ये इंदापूर तालुका इंडीयन मेडिकल असोसिएशनला अध्यक्षा डॉ. कल्पना मिलिंद खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली चार राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले.
महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉ. रवींद्र कुटे व सचिव डॉ. संतोष कदम यांच्या हस्ते अमरावती येथे पार पडलेल्या कार्यक्रमात पुरस्कार देण्यात आले. इंदापूर शाखेच्या वतीने अध्यक्षा डॉ. कल्पना खाडे, सचिव डॉ. प्रतिभा वणवे, डॉ. मिलिंद खाडे व डॉ. अतुल वणवे यांनी हे पुरस्कार स्वीकारले. इंदापूर तालुक्यातील पंधारवाडी गाव दत्तक घेत, ’आओ गावं चले’ सारखा प्रचंड मेहनतीचा प्रोजेक्ट यशस्वीपणे पार पाडला. त्यामुळे इंडियन मेडिकल असोसिएशनच्या इतिहासात पहिल्यांदाच इंदापूर तालुक्याला राज्यस्तरीय चार पुरस्कार मिळाले असल्याने तालुक्यातील वैद्यकीय सेवा करणार्या डॉक्टर वर्गात आनंदाचे वातावरण आहे.
इंदापूर आयएमए संघटनेच्या अध्यक्ष पदावर आजपर्यंत केवळ पुरुष डॉक्टरांची निवड होत असे; मात्र मागील वर्षी पहिल्यांदाच अध्यक्षपदी स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. कल्पना खाडे व सचिवपदी डॉ. प्रतिभा वणवे यांची निवड करण्यात आली. मिळालेल्या संधीचे सोने करीत, डॉ. खाडे व डॉ. वणवे यांनी वर्षभर प्रचंड मेहनत घेत संघटनेचे काम प्रामाणिकपणे पार पाडले. त्याची दखल राज्यस्तरावर घेतली गेली. त्यामुळे इंदापूर इंडियन मेडिकल असोसिएशनच्या इतिहासात सुवर्णअक्षरांनी कोरून ठेवावे असे कार्य त्यांच्या हातून घडले.
हे चार पुरस्कार
अमरावती येथे पार पडलेल्या कार्यक्रमात इंदापूर शाखेला बेस्ट स्मॉल ब्रँच, बेस्ट प्रेसिडेंट डॉ.कल्पना खाडे, बेस्ट सेक्रेटरी डॉ. प्रतिभा वणवे, ‘आओ गाव चले’ उपक्रमात उत्कृष्ट कामगिरीचा विशेष पुरस्कार.