पडळकर यांच्यावरील चप्पलफेकीचा निषेध
काटेवाडी – ओबीसी समाजाचे नेते आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर इंदापूर येथे केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ काटेवाडी (ता. बारामती) येथील चौकामध्ये इंदापूर-बारामती रस्ता रोको करून सकल ओबीसी समाजाच्या वतीने असे कृत्य करणार्या समाज कंटकांचा निषेध करण्यात आला.
इंदापूर ठिकाणी ओबीसी समाजाच्या वतीने घेण्यात आलेल्या मेळाव्यामध्ये काही अज्ञातांनी ओबीसी समाजाचे नेते व आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर भ्याड हल्ला केला याच्या निषेधार्थ सोमवारी (दि. 11) सकाळी 11 वाजता इंदापूर – बारामती रस्ता अडवून या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
यावेळी यशवंत ब्रिगेडचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष बापूराव सोलनकर, जय मल्हार संघटनेचे राज्याचे प्रवक्ते विष्णू चव्हाण, प्राध्यापक रवींद्र टकले, अॅड. अमोल सातकर, नवनाथ पडळकर, व्याख्याती प्रियदर्शनी कोकरे, जगदीश कोळेकर, गिरीधर ठोंबरे तसेच सर्व ओबीसी समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बापूराव सोलनकर म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आमचा कोणताही विरोध नाही; परंतु आमच्या ओबीसी समाजाच्या नेत्याला कोणी गालबोट लावत असेल किंवा त्यांची बदनामी करीत असेल तर अशा प्रकारचे वक्तव्य येथून पुढे ओबीसी समाज खपवून घेणार नाही.
येणार्या 24 तारखेनंतर काय होईल ते आम्ही दाखवू, असे मराठा समाजाकडून सांगितले जात आहे; परंतु जर का अशी वेगळी भूमिका घेतली तर येणार्या 2024 साली आम्ही ओबीसी काय आहे, ते दाखवून देऊ.