पळसदेवकरांचा संतप्त सवाल : ठेकेदाराच्या दिरंगाईचा त्रास
पळसदेव – येथील मुख्य बाजारपेठेतील रस्त्यावर टाकण्यात आलेली खडी धोकादायक ठरत असून, या मोकळ्या खडीमुळे मोटारसायकलस्वारांना मोठी कसरत करावी लागत आहे. वाहनाच्या टायरखालून खडा उडून लागण्याच्या घटना घडल्या असून, ठेकेदाराच्या दिरंगाईचा ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
दुचाकी चालवताना या खडीवरून घसरून अनेक दुचाकीस्वारांना अपघात झाल्याचा घटना होत आहेत. रस्त्यावरून खडी शाळकरी मुलगा जखमी झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी ग्रामपंचायत व ठेकेदार याच्या कार्यपद्धतीवर संताप व्यक्त केला. त्यामुळे आणखी किती नागरिकांची डोकी फुटल्यावर तुम्ही रास्ता करणार आहेत, असा संतप्त सवाल या वेळी नागरिकांनी उपस्थित केला.
या बाबत दिलीप काळे म्हणाले, मी रस्त्यावरून जाताना खडीवरून गाडी घसरली व पायाला दुखापत झाली आहे. माझ्यासारख्या नागरिक जखमी होण्याच्या अनेक घटना रोज घडत आहेत. गावातील मुख्य पेठेतील रस्याच्या कामाचा कॉंक्रीटीकरणाच्या टप्प्याचे काम सुरू करण्यात आले आहे. रस्त्याची रूंदी वाढवून तो मजबूत करण्यासाठी जुना डांबरी रस्ता उखडण्यात आला आहे.
उखडलेला रस्ता व रुंदीकरणाच्या साइडपट्ट्यांमध्ये मोठी खडी अंथरण्यात आली आहे. सध्या या खडीचा वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तरी तातडीने या रस्त्याचे काम होणे आवश्यक आहे. तातडीने या रस्त्याचे काम न झाल्यास ठेकेदाराच्या व ग्रामपंचायत प्रशासनच्या विरोधात आंदोलन करणार असल्याचे या वेळी नागरिकांनी बोलून दाखवलं.