बाळासाहेब बेंडे : भीमाशंकर साखर कारखान्याचा उपक्रम
मंचर – दत्तात्रयनगर, पारगाव (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर क ारखान्यामार्फत सभासद व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मंगळवार (दि. 17), बुधवार (दि. 18), गुरुवार (दि. 19) गावोगावी स्मार्ट कार्डचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती देताना बाळासाहेब बेंडे म्हणाले की, सहकार मंत्री व कारखान्याचे संस्थापक दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सभासद आणि ऊस उत्पादकांकरिता नेहमीच भविष्याचा विचार व आधुनिक प्रणालीचा वापर करून नवीन योजना कार्यान्वित करण्याचा प्रयत्न असतो. त्याचाच एक भाग म्हणून सभासद व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना स्मार्ट कार्डचे वाटप करण्यात येत आहे.
या स्मार्ट कार्डमुळे सभासद व ऊस उत्पादकांना साखर वाटप करणे सुलभ होणार आहे, तसेच स्मार्ट कार्डमुळे सभासद व ऊस उत्पादकांना घरबसल्या शेअर्सबाबत व आपल्या उसाच्या नोंदणीची, गाळपास आलेल्या प्रत्येक ऊस वाहनाच्या वजनाची, पंधरवडा ऊस बिल (ऊस विकास सवलती कपात तपशीलासह) संपूर्ण माहिती मिळणार आहे. याबरोबरच वार्षिक सर्वसाधारण सभेची उपस्थितीही स्मार्ट कार्डद्वारे घेतली जाणार आहे. भविष्यात स्मार्ट कार्डद्वारेच उसाची नोंदणी घेऊन ऊसतोड केली जाणार आहे.
यावेळी उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील म्हणाले की, सभासद व ऊस उत्पादकांनी आपला ओळखीचा पुरावा (आधार कार्ड, पॅनकार्ड, वाहन चालक परवाना) देऊन स्मार्ट कार्ड घेण्यात यावे. मुंबई, पुणे व बाहेर गावी रहिवासी असलेल्या सभासद व ऊस उत्पादकांनी आपल्या स्थानिक कुटुंबातील सदस्यास किंवा इतर नातेवाइकास मोबाइलद्वारे आधार कार्ड, ओळखपत्र व संमतीपत्र पाठवून स्मार्ट कार्ड घेता येईल.
सभासद व ऊस उत्पादक मयत असल्यास कागदपत्रांची कारखान्यावर पूर्तता करून स्मार्ट घेता येईल. सदरचे कार्ड हरविल्यास कार्डचा दुरुपयोग होऊ नये. याकरिता त्वरित कारखान्याशी संपर्क करावा, त्यामुळे कार्डवरील सुविधा बंद करणे शक्य होईल व नवीन कार्ड 100 रुपये भरणा करून कारखाना साईटवर उपलब्ध करून देता येईल. तरी आधार कार्डप्रमाणेच महत्त्वाचा दस्तऐवज म्हणून स्मार्ट कार्डचे जतन करून कारखाना सुविधांचा लाभ घ्यावा व स्मार्ट कार्डचा गैरवापर होणार नाही, याची दक्षता सभासदांनी घ्यावी, असे आवाहन केले.