अन्न व औषध प्रशासनाची कारवाई
शिक्रापूर – कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील एका ठिकाणी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अन्न सुरक्षा अधिकारी क्रांती बारवकर यांनी कारवाई करीत तब्बल एक लाख रुपयांचा गुटखा जप्त केला. गुटखा साठा करणाऱ्या तीलोकाराम गिरीधारीराम चौधरी (वय ३७, रा. वढू रोड, कोरेगाव भीमा ता. शिरुर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
कोरेगाव भीमा येथील वढू रोडलगत एकाने गुटखा पानमसाला बेकायदेशीरपणे साठा केला असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अन्न सुरक्षा अधिकारी क्रांती बारवकर यांना मिळाली. त्यांनी कर्मचाऱ्यांच्या सोबत स्टार बेकरीलगत मारुती एजन्सी दुकानात छापा टाकला. त्यांना साठा आढळला.
दरम्यान, साठा करणारे चौधरी यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. यावेळी पथकाने साठा जप्त केला. क्रांती बारवकर यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक माधुरी झेंडगे करत आहे.
अन्न व औषध प्रशासनाची मोठ्या ठेंड्यांवर कारवाई होणार का ?
महाराष्ट्रात गुटखा बंदी असताना शिरुर तालुक्यात प्रत्येक ठिकाणी मोठ्या प्रमाणात खुलेआम बेकायदेशीरपणे गुटखा विक्री होत असताना अन्न व औषध प्रशासन लहान मोठ्या ठिकाणी कारवाई करीत असताना प्रशासन मोठ्या ठेंड्यांवर कारवाई करणार काय, असा सवाल नागरिकांना पडला आहे.