पुणे : नेस वाडिया कॉलेज ऑफ कॉमर्सच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभास उपस्थित असलेले मान्यवर.
पुणे – शाळा-महाविद्यालयाच्या माध्यमातून जगामध्ये जाण्याची संधी प्रत्येक विद्यार्थ्याला उपलब्ध होत आहे. मात्र, ही संधी आणि यश मिळविण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात. प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या आई-वडिलांचे नाव मोठे केले पाहिजे, असे मार्गदर्शन संत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस. एन. पठाण यांनी व्यक्त केले आहे.
मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या नेस वाडिया कॉलेज ऑफ कॉमर्सचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ थाटात पार पडला. यावेळी महाराष्ट्र हिंद केसरीचे कुस्ती पैलवान अमोल बुचडे, प्राचार्या डॉ. वृषाली रणधीर, नौरोसजी वाडिया कॉलेजचे प्राचार्य डॉ. वसंत चाबुकस्वार, प्रबंधक राजेंद्र तागडे, उपप्राचार्या सोनया अय्यंगार, प्रबंधक जगदीश ठाकूर, ज्युनिअर कॉलेजचे स्पोर्ट्स टीचर प्रा. राजू मते, प्रा. सुप्रिया बैसानी, डॉ. लक्ष्मण बैसानी आदी उपस्थित होते. या संपूर्ण वार्षिक पारितोषिक वितरण समारंभासाठी संस्थेचे विश्वस्त प्रा. सचिन सानप, डॉ. अशोक चांडक यांनी मार्गदर्शन केले.
मॉडर्न एज्युकेशन सोसायटीला ९२ वर्षे पूर्ण झाली असून महाराष्ट्रातल्या अग्रगण्य शिक्षण संस्थांपैकी एक शिक्षणसंस्था आहे. सामाजिक स्तराचे प्रतिनिधित्व, शिक्षणकार्य, प्राध्यापकांच्या प्रयत्नांतून दर्जा टिकून ठेवणारी शिक्षणसंस्था आहे. संस्थेद्वारे महाविद्यालयीन पातळीवर ‘स्पोर्ट्स टॅलेंट सर्च’ स्थापन केले जाणार असून या टीममध्ये अमोल बुचडे यांनी संस्थेसोबत सामंजस्य करार करून प्रत्यक्ष सहभागी होऊन मार्गदर्शन करावे, असे आवाहन प्रा. सचिन सानप यांनी केले.
कुस्तीला शास्त्रशुद्धतेची जोड देऊन कुस्तीगीरांनी प्रामाणिक प्रयत्न केले तर नक्कीच महाराष्ट्रातील तरुण मुले कुस्तीमध्ये यश संपादन करतील. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला खेळाडूंची संख्या वाढविण्यासाठी शिक्षण क्षेत्रात सकारात्मक बदल करावे लागतील. मातीच्या कुस्तीतून पैसे मिळवता येतात. मात्र, मॅटच्या कुस्तीसाठी चांगल्या ‘कोच’ची आवश्यकता असते. खाशाबा जाधव यांचा वारसा चालवणे हे आपलं कर्तव्य आहे, असे अमोल बुचडे यांनी सांगितले.