मंचर – आंबेगाव तालुका कृषी विभागाच्या वतीने महाबळेश्वर भिलाई येथे प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन स्ट्रॉबेरी लागवड कशी करावी, याबाबतची माहिती आंबेगावातील आदिवासी शेतकऱ्यांना देण्यात आल्याची माहिती पंचायत समितीचे माजी सभापती संजय गवारी यांनी दिली .
आदिवासी भागात शाश्वत रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत कृषी विभागाच्या वतीने आदिवासी शेतकऱ्यांचा प्रशिक्षण कार्यक्रम शिनोली (ता. आंबेगाव) येथे जूनमध्ये झाला. या अनुषंगाने कृषी विभागाच्या आत्मा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रत्यक्ष याबाबत तेथील शेतकऱ्यांशी संवाद साधून प्रशिक्षण देण्यात आले.
भीमाशंकर आणि आहूपे परिसरातील वातावरण, माती हे स्ट्रॉबेरी पिकासाठी महाबळेश्वरच्या वातावरणाशी मिळतेजुळते असल्याचे लक्षात येते. या अनुषंगाने गेल्या वर्षी काही शेतकऱ्यांनी प्रायोगिक तत्त्वावर थोड्या प्रमाणात स्ट्रॉबेरी लागवड केली होती, त्या माध्यमातून चांगले उत्पादन त्यांना मिळाले आहे.
भविष्य काळात लक्ष घालून शेतकऱ्यांना पाण्याचा उपलब्धतेबरोबरच ठिबकद्वारे स्ट्रॉबेरी लागवडीचे या भागात मोठ्या प्रमाणात कार्यक्रम करण्याचा विचार सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी बोलून दाखविला होता. या कार्यक्रमासाठी माजी सभापती संजय गवारी, माजी जिल्हा परिषद सदस्य विजय आढारी, स्ट्रॉबेरी लागवड करणारे शेतकरी शंकर केंगले, विठ्ठल असवले, अनंता साळवे, आदिनाथ बेंढारी, कृषी सहायक ज्ञानेश्वर लोहकरे व धोंडिभाऊ पाबळे तसेच वीस गावातील आदिवासी शेतकरी महाबळेश्वर येथे आले होते.
अनुदानासाठी प्रयत्न
सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या भागात शाश्वत रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून आदिवासी शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरीचे अनुदान मिळावे म्हणून मागणी केली आहे. जिल्हा नियोजनमधूनही कृषी विभागामार्फत आदिवासी शेतकऱ्यांसाठी स्ट्रॉबेरी लागवडीचे अनुदान मिळावे म्हणून प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. हा कार्यक्रम यशस्वी झाल्यास ज्या शेतकऱ्यांना पाण्याची उपलब्धता आहे त्यांना ठिबकद्वारे स्ट्रॉबेरीची लागवड करता येणार आहे.