पुणे – नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर पूजा साहित्यांनी बाजारपेठा गजबजल्या आहेत. शहर आणि उपनगरांत ठिकठिकाणी घटस्थापनेसाठी लागणाऱ्या साहित्यांचे स्टॉल लावले आहेत. परंतु यंदा या साहित्यांचे भाव सरासरी 20 ते 25 टक्क्यांनी वाढले आहेत. परिणामी, भाविकांना महागाईच्या झळा बसणार आहे.
घटस्थापनेसाठी लागणारी मातीचे घट व इतर साहित्यांनी बाजारपेठा सजल्या आहेत. खरेदीसाठी भाविकांची गर्दी होणे सुरू झाले आहे. यात परडी, घट, हळद, कुंकू, गुलाल, हळकुंड, गुलाब पाणी, समई वात, मंडपी, लाल वस्त्र, दोरा गुंडी, अत्तर, गोमूत्र, गंगाजल, कापूर, विड्याची पाने, अत्तर, नारळ आदी वस्तूंचे भाव वाढल्याचे व्यापारी सांगत आहेत. त्यामुळे पूजा साहित्य खरेदी करताना ग्राहक विचार करत आहेत.
पूजा अन् पॅकेज किट…
देवीच्या पूजेसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व साहित्याचे बाजारात तयार किट मिळत आहे. सुमारे पाचशे रुपयांपासून हे किट उपलब्ध असून, वेगळ्या वस्तूंची मागणी असल्यास त्यानुसार वेगळे पॅकेज दिले जात असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. भाव वाढले, तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मागणी वाढली असल्याचेही सांगितले.
“सर्वत्र महागाई, वाहतूक खर्च वाढला आहे. त्याप्रमाणे पूजा साहित्याचे भावही वाढले आहेत. याची नागरिकांच्या खिशाला झळ बसत आहे.” – शिवाजी सावंत, पूजा साहित्य विक्रेते
साहित्याचे भाव गेल्यावर्षीचे भाव (रु.)
परडी (मध्यम) 100 80
घट (लहान जोडी) 60 50
कुुंकू (250 ग्रॅम) 50 40
हळद (250 ग्रॅम) 80 60
कापूर (250 ग्रॅम) 400 300
लाल वस्त्र (1 मी.) 80 60
माती (1 किलो) 30 20