१०२ ग्रामपंचायतींचे कर्मचारी संपावर ः पाणीपुरवठाही विस्कळीत
मंचर – राज्यभरातील ग्रामपंचायत कर्मचारी विविध मागण्यांसाठी तीन दिवसीय संपावर गेले असून आंबेगाव तालुक्यातील १०२ गावातील ग्रामपंचायत कर्मचारीही संपावर गेल्याने गावातील पाणीपुरवठ्यासह इतर कामावर परिणाम झाल्याने कामकाज विस्कळीत झाले आहे .
ग्रामपंचायत कर्मचारी विविध मागन्यासाठी दि. १८, १९, २० डिसेंबर हे तीन दिवस संपावर गेल्याने गावागावांतील ग्रामपंचायत कामकाज ठप्प झाले आहे. तसेच गावागावातील नळ पाणीपुरवठा योजनेवर परिणाम झाला असून पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने ग्रामपंचायतने पर्यायी व्यवस्था करुन पाणीपुरवठा योजना सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे पाहावयास मिळत आहे.
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नगरपालीका व जिल्हा परिषद कर्मचाऱ्याप्रमाणे वेतनश्रेणी मंजूर करणे, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन लागु करणे, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना उपदान लागु करणे, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची भविष्यनिर्वाह निधीची रक्कम कामगार भविष्य निधी संघटन (इपीएफ) या कार्यालयात करणे, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सुधारीत किमान वेतन लागू करणे व वेतनासाठी लादलेली वसुलीची अट रद्द करणे, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या आकृतिबंधात सुधारणा करणे, जिल्हा परिषद सेवेत ग्राम पंचायत कर्मचाऱ्यामधून एकुण रिक्त पदाच्या १० टक्क्यांप्रमाणे वर्ग ३ व वर्ग ४ चे पदावर नियुक्ती देणे, माहे ऑगस्ट २०२० ते मार्च २०२२ पर्यंतचा थकीत वेतन तात्काळ अदा करणे इत्यादी मागण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी तीन दिवस काम बंद आंदोलन चालू केले आहे.
या आंदोलनामुळे गावागावातील ग्रामपंचायतची असलेली विविध कामे ठप्प झाले आहे. शासनाने आमच्या मागण्या मान्य कराव्यात व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांकडे लक्ष द्यावे. यासाठी संप केला असून संपात सहभागी होण्यासंदर्भात याबाबत महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेना आंबेगाव तालुका यांच्या वतीने घोडेगाव येथील पंचायत समिती गट विकास अधिकारी प्रमिला वाळूज यांना निवेदन देण्यात आले असल्याचे ग्रामपंचायत कामगार सेनेचे पुणे विभागीय अध्यक्ष सुरेश हिंगे पाटील यांनी सांगितले. यावेळी पुणे जिल्हाध्यक्ष संदीप मनकर, आंबेगाव तालुका अध्यक्ष किसन भोजने, उपाध्यक्ष पवन शिंदे, सचिव अविनाश वाघ, सचिव संतोष नेमाने, महिला अध्यक्षा अर्चना गावडे, सचिव संगीता जाधव आदी उपस्थित होते.