बॅंक खात्यावर लवकरच अनुदान जमा होण्याचे संकेत
राजगुरूनगर – महाआघाडी सरकार सत्तेवर येताच 2019 मध्ये राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी योजना जाहिर केली. शेतकऱ्यांची थकीत पीककर्जे माफ करून दिलासा दिला; मात्र नियमित पिककर्जे भरणाऱ्यांना घोषणेप्रमाणे अनुदान देण्याबाबत शासकीय पातळीवर कार्यवाही होत नव्हती; मात्र आता याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. लवकरच शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर अनुदान जमा होणार असल्याचे संकेत मिळाले आहे. नियमित कर्जपरतफेड करणा-यां शेतकरी वर्गातुन समाधान व्यक्त केले जात आहे.
राज्य शासनाने 2019 सालात शेतकऱ्यांचा थकीत कर्जमाफी करण्याचा निर्णय घेत महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबवल्याने थकीत शेतकऱ्यांचे कर्जमाफी झाली. नियमित कर्जपरतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर जास्तीत जास्त 50 हजारापर्यंत अनुदान देण्याची घोषणा केली होती. यावर आता राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या थेट बॅंक खात्यावर जमा करण्याची कार्यवाही करण्याचे आदेश महाराष्ट्र राज्याचे सहकारी संस्थाचे सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी 6 मे 2022 रोजी राज्यातील विभागिय सहनिबंधकाना परीपत्रकाद्वारे आदेश जारी केले आहे.
2017-18, 2018-19, 2019-20 या तीनपैकी एक किंवा दोन वर्षांमध्ये पिक कर्जाची उचल घेऊन विहित मुदतीत कर्जपरडफेड केली अशा शेतकऱ्यांची माहिती संकलित करुन संगणक प्रणालीत अपडेट माहिती भरण्याचे आदेश देण्यात आले असून तालुका सहकार निबंधक कार्यालयाच्या वतीने सहकार सोसायटीच्या सचिवांना सूचना देण्यात आल्या असल्या तरी सध्या सर्व राज्यभरातील सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुका या अंतिम टप्यात आल्या असल्या तरी सध्या खरीप हंगामातील पीक कर्ज वाटप प्रक्रीया सोसायटी मार्फत सुरू असल्याने सचिव मंडळी सध्या कामात मग्न असताना, नियमित कर्जपरतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान मिळण्यासाठी सचिव मंडळी सर्तक झाले आहेत. शासनाने येत्या आठ दिवसांत माहिती मागवल्याने मात्र सचिव मंडळीची चागंलीच धावपळ सुरू होताना दिसत आहे.
महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतंर्गत नियमित कर्जपरतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची विहित नमुन्यात संगणक प्रणालीद्वारे माहिती मागवण्यात आली असून सोसायटी पातळीवर सचिव मंडळी माहिती संकलित करत आहे. तरी शेतकरी सभासदांनी याबाबत सचिवांशी संपर्क साधुन सहकार्य करावे.
– हरिश्चंद्र कांबळे, सहकार निबंधक