शिरूर – हवेलीत पाहायला मिळणार राजकीय बदलांची शृंखला
“ती’ धडपड भाजपसाठी संजीवनी ठरली
दत्तात्रय गायकवाड
वाघोली – शिरूर – हवेली विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला भरघोस मतांनी पाठिंबा देत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार अशोक पवार यांची आमदारपदी वर्णी लागली. आमदार पवार यांना मिळालेली मते राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची या मतदारसंघातील जमेची बाजू ठरली. त्यानंतर राजकीय बदलांची शृंखला मतदारसंघात पाहावयास मिळाली. आता राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, मनसे व कॉंग्रेस यांच्या विरोधात तिसरी आघाडी स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्याच्या चर्चेला शिरूर-हवेली मतदारसंघात उधाण आले आहे.
पुणे जिल्हा परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष प्रदीप कंद यांनी सहकार क्षेत्रात पदार्पण करत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेवर संचालकपदी विराजमान होण्यासाठी केलेली धडपड भाजपसाठी संजीवनी ठरली आहे. भाजपमध्ये अनेक दिग्गजांची फौज आगामी जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती निवडणुकीसाठी सज्ज झाली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचा हवेली तालुक्यातील चेहरा शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार, तर भाजपचा हवेली तालुक्यातील चेहरा म्हणून प्रदीप कंद ओळखले जात आहेत.
राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षातील अनेक राजकीय दिग्गज मंडळी आगामी जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती निवडणुकांमधून आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी सरसावले आहेत. याखेरीज मतदार संघातील पुनर्रचना झाल्यानंतर मित्रमंडळींना सोबत घेऊन काहीजणांनी पक्ष बाजूला ठेवून स्थानिक पातळीवर आघाडी करण्याची भूमिकाही स्पष्ट केली आहे. शिरूर-हवेली विधानसभा मतदार संघातील हे बदल आमदारकीची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून होत असल्याचे दिसून येत आहे.
शिरूर – हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती निवडणुका रंगतदात होणार आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला म्हणून हवेली तालुका ओळखला जातो, ही ओळख कायम ठेवण्यासाठी सर्व कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत.
– रामभाऊ दाभाडे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजप नेते प्रदीप कंद यांच्या मार्गदर्शनाखाली हवेली तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका होणार आहेत. भाजपचे जास्तीत जास्त उमदेवार निवडून येण्यासाठी भाजपचे सर्व कार्यकर्ते पक्षाची ध्येयधोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
– संदीप सातव, भाजप नेते
23 गावांत ठरणार राजकारणाची नांदी
पुणे महानगरपालिकेत नुकत्याच समावेश झालेल्या 23 गावांत महानगरपालिकेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू होणार आहे. सध्या या गावांवर स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच राजकीय मंडळींचे मोठे वर्चस्व आहे. ही तेवीस गावे पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी मोठी कलाटणी देणारी बाब ठरणार आहे. यासाठीदेखील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष भाजप शिवसेना मनसे व इतर मित्र पक्ष तयारीला लागले आहेत.