नारायणगाव – जुन्नर तालुक्यातील शाळांचा दर्जा उत्तम असून भौतिक सुविधा निर्माण करण्यासाठी आमदार म्हणून सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे आमदार अतुल बेनके यांनी म्हटले आहे.
जुन्नर तालुक्यातील प्राथमिक शाळांमध्ये ज्ञानदानाचे उत्कृष्ट कार्य करणार्या शिक्षकांना पंचायत समिती जुन्नरच्या वतीने नारायणगाव येथे ’तालुका गुणवंत शिक्षक पुरस्कार 2023’ प्रदान कार्यक्रमात बोलत होते. तालुक्यातील 55 शिक्षकांना गुणवंत शिक्षक पुरस्कार देण्यात आला. सहा शिक्षकांना शिष्यवृत्ती मार्गदर्शक पुरस्कार तसेच गुणवंत शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, कर्मचारी, परसबाग स्पर्धेतील विजयी शाळा, अध्यक्ष चषक पुरस्कार शाळा, जिल्हा गुणवंत शिक्षक पुरस्कार मिळालेल्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या आळेफाटा व राजुरी शाळांना आमदार चषक घोषित करण्यात आला.
जिल्हा नियोजन समिती सदस्या आशाताई बुचके म्हणाल्या, जुन्नर तालुक्यातील जास्तीत जास्त शिक्षकांना गुणवंत शिक्षक पुरस्कार मिळावा व तालुका शैक्षणिक गुणवत्तेत प्रथम क्रमांकावर यावा. गटशिक्षणाधिकारी अनिता शिंदे यांनी जुन्नर तालुक्यातील शैक्षणिक कार्याचा आढावा सांगताना जुन्नर तालुका गुणवत्तेत अग्रेसर असून शिक्षकांच्या मदतीने पहिल्या क्रमांकावर नेणार असल्याचे सांगितले.
यावेळी विघ्नहर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अशोक घोलप, सागर कोल्हे, कृषिरत्न अनिलतात्या मेहेर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य विकास दरेकर, ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटे, माजी पंचायत समिती सदस्य दिलीप गांजाळे, विक्रांत नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष संतोष वाजगे, सचिव निलेश गोरडे, देवीचंद कटारिया, आनंद कटारिया, सहाय्यक गटविकास अधिकारी निलेश बुधवंत, गटशिक्षणाधिकारी अनिता शिंदे, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, शिक्षक संघटनांचे पदाधिकारी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अनुपमा पाटे व भाऊसाहेब खाडे यांनी तर केंद्रप्रमुख संजय जाधव यांनी आभार मानले.