भोर, (प्रतिनिधी) – भोर शिक्षक व वाचकांच्या ‘पुस्तकाची भिशी’ समूहाच्या वतीने तालुक्यातील विविध शाळा व सामाजिक संस्थांना ३५० पुस्तकांचे मोफत वाटप करण्यात आले. यामध्ये ऐतिहासिक, सामाजिक, शैक्षणिक, कवितासंग्रह, कलाविष्कार, आत्मचरित्र आदी पुस्तकांचा समावेश आहे.
नागरिकांमध्ये वाचन संस्कृती रुजावी व वाढावी यासाठी पुस्तक भिशी समूहाच्या वतीने भोर शहर आणि तालुक्यात ‘जगद्गुरू संत तुकाराम वाचन चळवळ’ सुरू केली आहे. जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधून येथील हॉटेल सोनाली गार्डनच्या सभागृहात विशेष कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये तालुक्यातील सात शाळा व संस्थांना पुस्तके भेट देण्यात आली.
पुस्तक भिशी समूहाचे डॉ. सुरेश गोरेगावकर, भोर एज्युकेशन सोसायटीचे संचालक सुरेशभाई शहा, फुले शाहू आंबेडकर विचार प्रसारक मःडळाचे संस्थापक संतोष दळवी, धनंजय कोठावळे, मनोविकास प्रकाशनचे संचालक विलास पाटील, सोमनाथ कुंभार, आनंदराव वीर, सचिन कदम, संकल्प प्रतिष्ठानचे संचालक सुदाम ओंबाळे,डॉ. आनंदा कंक आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी डॉ. रोहिदास जाधव यांचे वाचन संस्कृतीसाठी भाषा समजून घेताना या विषयावर व्याख्यान झाले. डॉ. जाधव यांनी वाचन संस्कृतीचे महत्त्व आणि सद्यस्थितीमधील स्मार्टफोनच्या वापरात वाचनाचे महत्त्व कसे टिकून आहे, याबाबत माहिती दिली. सविता कोठावळे व सुजाता दळवी यांनी सूत्रसंचालन केले.